फायजर कंपनीच्या लसीला मिळाली अनुमती : पहिला देश ठरला
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडात लवकरच 12-15 वयोगटातील मुलांनाही कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. देशात फायजरच्या कोविड लसीला या वयोगटासाठी अनुमती मिळाली आहे. 12 वर्षांच्या मुलासाठी लसीला मंजुरी देणारा कॅनडा जगातील पहिला देश आहे. यापूर्वी 16 वर्षे किंवा याहून अधिक वयाच्या लोकांच्या लसीकरणाची अनुमती होती.
हेल्थ कॅनडातील मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉक्टर सुप्रिया शर्मा यांनी या निर्णयाची पुष्टी दिली आहे. लसीकरणामुळे मुलांना सुरळीत जीवनात परतण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सद्यकाळात अमेरिका आणि युरोपीय महासंघाकडून फायजरच्या लसीच्या परिणामांची समीक्षा केली जात आहे. 12-15 या वयोगटासाठी लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. कॅनडात मुलांसाठी मान्यता मिळालेली ही पहिली लस असल्याची माहिती शर्मा यांनी दिली आहे.
अमेरिकेकडून तयारी
अमेरिकेचे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन पुढील आठवडय़ायपर्यंत मुलांसाठी फायजर लसीला अनुमती देणार असल्याचे मानले जात आहे. कंपनीची लस मुलांवरही प्रभावी असल्याचे आढळून आले हेते. मार्च महिन्यात फायजरने 12-15 वयोगटातील 2260 स्वयंसेवकांवर झालेल्या अध्ययनाचे प्रारंभिक निष्कर्ष प्रसिद्ध केले होते. प्लेसिबोच्या तुलनेत या वयोगटात लस प्राप्त केलेल्या लोकांमध्ये कोरोना संसर्ग आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले होते.
कोरोनाच्या संक्रमणाचा 20 टक्के हिस्सा मुले आणि तरुणांमधील आहे. या वयोगटाचे लसीकरण कॅनडाच्या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. बहुतांश मुलांना कोविड-19 मुळे गंभीर आजार जाणवला नाही. अशा स्थितीत लस त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेत मदत करणार असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
मुलांमध्येही साइड इफेक्ट्स
मुलांमध्येही तरुणांप्रमाणे समान साइड इफेक्ट्स दिसून आले आहेत. यात ताप, वेदना, थंडी व थकवा सामील आहे. पण दीर्घकालीन सुरक्षेसाठी 2 वर्षांपर्यंत अध्ययन सुरू राहणार आहे. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये कॅनडातील लसीकरणाला वेग आला आहे.