गोवा फॉरवर्डचा सवाल : केवळ 20 हजार पगारावर 82 डॉक्टर्सची सेवा
प्रतिनिधी / पणजी
नॅशनल हॅल्थ मिशन अंतर्गत गोव्यात सेवा देणारे व सध्या कोरोना रुग्णांची सेवा करणारे 82 आयुष डॉक्टर्स केवळ 20 हजारांच्या पगारावर काम करत आहेत. गत तीन महिन्यांपासून त्यांच्या पगारासंबंधीची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर निर्णयासाठी प्रलंबित असताना सरकारने त्यानंतर नियुक्त केलेल्या डॉक्टर्सना मात्र 50 हजार पगार दिला जात आहे, हा भेदभाव अनाकलनीय आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे.
एका बाजूने रुग्णांची संख्या भयानक वेगाने वाढत आहे आणि त्यांच्या सुश्रुसेसाठी डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचाऱयांची प्रचंड कमतरता भासत असल्याचे स्वतः सरकारने मान्य केले आहे. अशावेळी असलेल्या डॉक्टर्सना खूश ठेवणे हे सरकारचे कर्तव्य होते. परंतु मुख्यमंत्री त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करत आहेत, असे कामत यांनी म्हटले आहे.
स्वतः डॉक्टर असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री खरोखरच डॉक्टर असते तर त्यांना दुसऱया डॉक्टरांचे दुःख, अडचणी यांची जाणीव असायला हवी होती. परंतु मुख्यमंत्री पूर्णतः असंवेदनशीलता दाखवत असून त्या 82 डॉक्टर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना सूपर सीएमची मान्यता घ्यावी लागणार आहे का? असा सवाल कामत यांनी उपस्थित केला आहे. तशी परिस्थिती नसेल तर मुख्यमंत्र्यांनी सदर आयुष डॉक्टरांचा प्रश्न त्वरित सोडवावा, त्याचप्रमाणे कोविड फ्रंटलाईन वर्कर्सना 20 टक्के पगारवाढ देण्याच्या गतवर्षी दिलेल्या आश्वासनाचीही पूर्तता करावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे.
गोव्यातील ऑक्सिजन महाराष्ट्रात?
दरम्यान, गोव्यात सध्या ऑक्सिजनच्या प्रचंड तुटवडय़ामुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडत असताना स्वतःची गरज तेथेच ठेवत महाराष्ट्रातील एका मंत्र्याच्या इस्पितळासाठी गोव्यातून ऑक्सिजन पाठविण्यात येत असल्याचा प्रकार फॉरवर्डने उघडकीस आणला आहे. कोरोना महामारीच्या या दुःखद काळात एकदुसऱयाला मदत करणे हे माणुसकीचेच लक्षण असले तरीही आधी स्वतःची माणसे जगली पाहिजे याचे भान सरकारने ठेवले पाहिजे, असे कामत यांनी म्हटले आहे.
वेर्णा येथील एका कारखान्यात उत्पादित ऑक्सिजन सिलिंडर्स पत्रादेवी सिमेवरून ट्रक भरभरून नेण्यात येत असतानाचे फोटोही हाती लागले असल्याचे सांगताना ही गोष्ट अत्यंत चुकीची असल्याची टीका फॉरवर्डने केली आहे.