वृत्तसंस्था/ टोकियो
जुलैमध्ये होणाऱया टोकियो ऑलिम्पिकला स्थानिक जनतेचा विरोध होत असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणात आढळून आले. आता जपानमधील वैद्यकीय संघटनेनेही ऑलिम्पिकला विरोध केला असून कोरोना रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने हॉस्पिटल्स आधीच फुल्ल झालेली आहेत, अशा स्थितीत ऑलिम्पिक रद्द करण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.
टोकियो मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनमध्ये सुमारे 6000 डॉक्टर्सचा समावेश असून टोकियोमधील सर्व हॉस्पिटल्समधील जागा कोरोना रुग्णांनी पूर्ण भरल्या असल्याने तेथे नव्या पेशंट्सनाही जागा मिळत नाही, अशी स्थिती आहे. ‘आयोजन समितीच्या पदाधिकाऱयांना आमची मनापासून विनंती आहे की, अशा परिस्थितीत स्पर्धा भरविणे खूप कठीण असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओसी) पटवून द्यावे आणि त्यांना स्पर्धा रद्द करण्यास भाग पाडावे,’ असे टोकियोच्या वैद्यकीय संघटनेने 14 मे रोजी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.
जपानच्या या राजधानीत कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली असल्याने मेडिकल स्टाफ व बेड्स उपलब्ध होणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे जपान सरकारने टोकियो व अन्य काही शहरात 31 मेपर्यंत आणीबाणीही जाहीर केली आहे. ‘सर्व मेडिकल स्टाफ केरोना रुग्णांच्या सेवेत गुंतला असल्याने ऑलिम्पिकवेळी ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार नाहीत,’ असे मेडिकल संघटनेने पत्रात म्हटले आहे. याशिवाय उन्हाळा सुरू होत असल्याने उष्णतेच्या लाटेने प्रभावीत झालेल्या रुग्णांकडे लक्ष देण्याची जादाची जबाबदारीही या डॉक्टरांवर पडणार आहे. अशा स्थितीत ऑलिम्पिक झाले आणि मृतांची संख्या वाढल्यास जपान सरकारला त्यासाठी जबाबदार धरले जाईल, असेही या पत्रात म्हटले आहे. आरोग्य खात्यातील अनेक तज्ञांनीही ऑलिम्पिकबाबत चिंता व्यक्त केली आहे तर हजारो लोकांनी स्वाक्षऱया करून ऑलिम्पिक रद्द करण्याबाबत ऑनलाईन याचिकाही दाखल केली आहे. जपानमध्ये आतापर्यंत फक्त 3.5 टक्के लसीकरण झाले असल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे.