रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव, धोकादायक बुरशीजन्य आजार
परशुराम कोकणे / सोलापूर
कोरोनासोबतच आता म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. सोलापुरात 200 ते 300 रुग्णांना म्युकर मायकोसिसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. म्युकर मायकोसिसवरील उपचारात महत्त्वपूर्ण असलेले इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.
कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर मिळत नसल्याने निर्माण झालेली स्थिती आपण सारे जाणून आहोत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनातून बरे झालेल्या वृद्ध आणि इतर आजार असणाऱया रुग्णांना म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत आहे. या संदर्भातील उपचार घेण्यासाठी सोलापुरातील नाक, कान, घसा तज्ञांकडे मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत. सद्यःस्थितीत सोलापुरात 200 ते 300 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग सामान्यत: नाकातून होतो. तो हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. यातून पुढे डोळ्यांना धोका निर्माण होतो. शस्त्रक्रिया करूनही रुग्णांना वाचविणे अवघड झाले आहे. दरम्यान, सोलापुरात नेमके किती रुग्ण आहेत याचा डाटा अद्याप उपलब्ध नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले
वेळीच काळजी घ्या, म्युकर मायकोसिस टाळा
कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार विशेषत: मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत आहे. अशा रुग्णांना सहा आठवड्यांपर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
ही आहेत लक्षणे
गाल दुखणे, सुज येणे
डोळे दुखणे, सुज येणे
दृष्टी अंधूक होणे
डोळ्यांना दोन प्रतिमा दिसणे
नाका दुखणे, सतत वाहू लागणे
दात, दाढ हलू हलणे आणि तीव्र वेदना होणे
ही घ्या काळजी
लक्षणे दिसून लागल्यास त्वरित नाक, कान, घसा तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा.
मधुमेही व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासावे.
मास्क नियमित वापरावा आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे.
रोज नवीन रुग्ण वाढताहेत
सध्या म्युकर मायकोसिसच्या अनुषंगाने सोलापूरची स्थिती फारच वाईट आहे. या आजाराचे रुग्ण मी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून पाहतोय. पण गेल्या काही दिवसांत रुग्ण वाढत आहेत. कोरोनावरील उपचार करताना म्युकर मायकोसिसची समस्या उद्भवेल याचा फारसा कोणी विचार केला नव्हता. मधुमेही रुग्णांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. रोज नवीन रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे यावर कधी नियंत्रण येईल हे सांगता येत नाही. रुग्णांची संख्या वाढल्याने इंजेक्शन, औषधे कमी पडणारच. कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही स्वरूपात निष्काळजीपणा नकोय.
– डॉ. कौस्तुभ तांबेकर, मुख्य दंत शल्यकर्म चिकित्सक
प्रशासनाला जाग येईना
उशीर होऊन सुद्धा प्रशासनास जाग आलेली नाही. म्युकर मायकोसिस झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी खूपच धावाधाव करावी लागत आहे. इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सुविधा करायला हवी. माझ्या कुटुंबातील सदस्यासाठी म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शन मिळविण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी अनेकांना संपर्क केला पण काहीच उपयोग होईना. काही ठिकाणी हे इंजेक्शन खूपच जास्त कमीमध्ये विकले जात आहे. सर्वसामान्य लोकांना दागिने, घरातील वस्तू विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
– मयूर स्वामी, रुग्णाचे नातेवाईक