फिफाच्या विविध स्पर्धांच्या तारखांना कौन्सिलची मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी भारतात यू-17 महिलांची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे फिफा कौन्सिलने गुरुवारी जाहीर केले.
सदर स्पर्धा भारतातचा मागील वर्षी घेण्याचे ठरले होते. पण कोरोना महामारीच्या उदेकामुळे 2021 पर्यंत ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण नंतर ती स्पर्धाच रद्द करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये या स्पर्धेचे यजमानपद भारताकडेच कायम ठेवत 2022 च्या आवृत्तीच्या स्पर्धा आयोजनाचे हक्क भारताला बहाल केले गेले होते. 71 व्या फिफा काँग्रेसच्या पूर्वसंध्येला फिफा कौन्सिलने आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कॅलेंडरमधील प्रमुख स्पर्धांच्या तारखांना मंजुरी दिली, त्यात भारतातील यू-17 महिला विश्वचषक स्पर्धेचाही समावेश आहे. ‘कौन्सिलने भारतातील यू-17 महिला विश्वचषक स्पर्धा (11-30 ऑक्टोबर 2022), कोस्टारिकातील यू-20 महिला विश्वचषक स्पर्धा (10-28 ऑगस्ट 2022) यांच्या तारखांना तसेच 14 संघांच्या सहभागाची फिफा अरब चषक 2021 (19 ते 25 जून) स्पर्धेच्या तारखेला मान्यता दिली आहे,’ असे फिफाने सांगितले.
या स्पर्धांप्रमाणे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये 2023 साली होणाऱया महिलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या तारखांनाही कौन्सिलने मंजुरी दिली आहे. ही स्पर्धा 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेतली जाणार आहे. ‘महिला विश्वचषक 2023 साठी नवी प्लेऑफ स्पर्धा घेतली जाणार असून 2023 मध्येच 17 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ती घेतली जाणार आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.