वर्ल्ड ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप – 67 किलो गटात मिळाले चौथे स्थान
वृत्तसंस्था/ ताश्कंत
भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिननुआंगाच्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याच्या आशेला धक्का बसला असून येथे सुरू असलेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचे पदकही अगदी थोडक्यात हुकले.
गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 18 वर्षीय जेरेमीला गुडघ्याची दुखापत झाली होती. येथे त्याने 67 किलो वजन गटात स्नॅचमध्ये 135 तर क्लीन व जर्कमध्ये 165 किलो वजनांसह एकूण 300 किलो वजन उचलले. मात्र त्याचे कांस्यपदक केवळ एका किलोने हुकले. तुर्कीच्या मुहम्मद फुरकान ओझबेक (141+176¾317 किलो) व युसूफ फेहमी (133+168¾301 किलो) यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक मिळविले. कझाकच्या अकमोल्दा सैरामकेझने (132+176¾308 किलो) रौप्यपदक पटकावले. जेरेमीला (26 वे मानांकन) आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपासही मजल मारता आली नाही. स्नॅचमध्ये 140, क्लीन व जर्कमध्ये 167 आणि एकूण 306 किलो ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने येथील स्पर्धेत जर 313 किलो वजन उचलले असते तर खंडीय कोटय़ातून त्याचे टोकियो ऑलिम्पिकमधील स्थानही निश्चित झाले असते. आता दक्षिण कोरियाच्या हान म्येयाँग मॉकला (21 वे मानांकन) या कोटय़ातून ऑलिम्पिक तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मात्र पात्र खेळाडूंची अंतिम यादी तयार होईपर्यंत जेरेमीला आशा बाळगता येईल.