जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत- ‘प्लेईंग कंडिशन्स’ची आयसीसीकडून घोषणा
दुबई / वृत्तसंस्था
साऊदम्प्टन येथील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत अनिर्णीत किंवा टाय झाल्यास भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आयसीसीने शुक्रवारी केली. मागील बऱयाच दिवसांपासून या लढतीच्या प्लेईंग कंडिशन्सची प्रतीक्षा होती. निर्धारित 5 दिवसांमधील काही खेळ होऊ शकला नाही तर सहावा दिवस यासाठी राखीव ठेवला गेला असून या दिवसात तो खेळ भरुन काढला जाईल, असे आयसीसीने यावेळी जाहीर केले आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील ही महत्त्वपूर्ण लढत दि. 18 जूनपासून साऊदम्प्टनवरील एजिस बॉल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या रुपरेषेनुसार, दोन्ही संघातील ही महत्त्वाची लढत दि. 18 ते 22 जून या कालावधीत खेळवली जाईल आणि दि. 23 हा सहावा दिवस राखीव स्वरुपाचा असेल. निर्धारित 5 दिवसांच्या कालावधीत काही कारणामुळे खेळ होऊ शकला नाही तर जितका वेळ खेळ झालेला नसेल, त्याची भरपाई सहाव्या दिवशी केली जाणार आहे. जर पाचही दिवस पूर्ण खेळ झाला असेल तर सहाव्या दिवशी खेळ घेतला जाणार नाही. ज्या दिवशी काही वेळ खेळ होणार नाही, त्याच दिवशी सामनाधिकारी दोन्ही संघ व माध्यमांना याची माहिती देतील. राखीव दिवशी खेळ घ्यायचा का, याचा निर्णय पाचव्या दिवसाच्या खेळात शेवटच्या तासाभरात घेतला जाणार आहे, याचाही आयसीसीने उल्लेख केला.
यापूर्वी, भारतीय संघ मायदेशातील कसोटी मालिकेत एसजी टेस्ट बॉलने खेळला तर न्यूझीलंडचा संघ मायदेशातील मालिकेत कुकाबुरा चेंडूसह खेळत होता. येथील अंतिम लढतीत ग्रेड 1 डय़ूक्स बॉल असणार आहेत.
प्लेईंग कंडिशन्समध्ये 3 महत्त्वाचे बदल
आंतरराष्ट्रीय ‘प्लेईंग कंडिशन्स’मध्ये महत्त्वाचे 3 बदल केले गेले असून त्याची अंमलबजावणी भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढतीत केली जाणार आहे. श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील मालिकेत सदर 3 नियम यापूर्वीच लागू केले गेले आहेत.
1) शॉर्ट रन्स- मैदानी पंचांनी शॉर्ट रन आहे का, हे तपासून पाहण्याची विनंती केली तर तिसरे पंच रिव्हय़ू पाहतील आणि पुढील चेंडू टाकला जाण्यापूर्वी मैदानी पंचांकडे आपला निर्णय कळवतील.
2) प्लेयर रिव्हय़ू- क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाचा कर्णधार किंवा बाद झालेला फलंदाज यापैकी कोणीही पायचीतचा रिव्हय़ू घेतला जाण्यापूर्वी चेंडू खेळण्याचा खरोखरच प्रयत्न झाला होता का, याची मैदानी पंचांकडून खातरजमा करवून घेऊ शकतील.
3) डीआरएस रिव्हय़ूज- पायचीत रिव्हय़ूसाठी विकेट झोनची उंची स्टम्पच्या टॉपपर्यंत वाढवली गेली आहे. यामुळे अंपायर्स कॉल मार्जिन व हाईट मार्जिन समसमान राहील.