रेंवडेतील घटना – रोख रक्कम, दागिन्यांसह लाखाचा ऐवज लंपास
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाने माणुसकी शिकवली असे म्हणत असलो तरी काही घटना अशा काही समोर येतात की माणुसकीही थिजून जाते. अशीच घटना सातारा तालुक्यातील रेवंडे येथे घडली असून कोरोना बाधित असल्याने क्वारंटाईन असलेल्या एका पुटुंबाच्या घरातच चोरटय़ांनी चोरी करत रोख रक्कम, सोन्याचे दागिने अशा एकूण लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार लहू रामचंद्र भोसले (वय 42, रा. रेवंडे, ता. सातारा) हे ग्रामपंचायत शिपाई आहेत. त्यांच्या कुटुंबातील सगळय़ांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दि. 3 रोजी ग्रामदक्षता समितीने सर्व कुटुंबाला घराशेजारी गोठय़ात क्वारंटाईन केले आहे. हे आई, पत्नी मुलांसह सर्वजण गोठय़ातच झोपलेले होते.
दि. 4 रोजी भोसले यांचा मुलगा घराकडे गेला असताना त्याला दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसले. मग त्याने घरात जावून पाहिले असता हॉलमधील कपाट उघडे दिसले व साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते. चोरटय़ांनी कपाटातील 28 हजार रुपये किंमतीचा लक्ष्मीहार, 40 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठय़ा, 16 हजार रुपये किंमतीची सोन्याची कर्णफुले, 5 हजार रुपये किंमतीची नथ आणि 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 97 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला असून आयसोलेशनमध्ये असलेल्या ठिकाणीच भोसले यांच्याकडून तक्रार घेतली. या घटनेची मात्र गावात चर्चा सुरु होती. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी झाल्याने संताप व्यक्त होत होता. पोलीस आता या चोरटय़ांचा शोध घेत आहेत.