नदाल, फेडरर, जोकोविच, गॉफ, केनिन, स्वायटेक चौथ्या फेरीत, स्विटोलिना, कोन्टावेट पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
स्लोव्हेनियाच्या तमारा झिदान्सेकने पहिल्यांदाच पेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. एखाद्या ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती स्लोव्हेनियाची पहिलीच महिला टेनिसपटू आहे. याशिवाय अमेरिकेची सोफिया केनिन, बार्बरा क्रेसिकोव्हा, विद्यमान विजेती इगा स्वायटेक, स्लोअन स्टीफेन्स, कोको गॉफ, 13 वेळा स्पर्धा जिंकणारा स्पेनचा राफेल नदाल, जागतिक अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविच, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांनी या स्पर्धेची चौथी फेरी गाठली. मात्र इलेना स्विटोलिना, ऍनेट कोन्टावेट, कॅरोलिना मुचोव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले तर जेनिफर ब्रॅडीने दुखापतीमुळे माघार घेतली.
झिदान्सेक जागतिक क्रमवारीत 85 व्या स्थानावर असून आजवर तिने एकदाही ग्रँडस्लॅमची दुसरी फेरी पार केली नव्हती. यावेळी मात्र तिने रोमानियाच्या बिगरमानांकित सोराना सिर्स्टियाचा 7-6 (7-4), 6-1 असा पराभव करून पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला. अटीतटीचा पहिला सेट टायब्रेकरमध्ये झिदान्सेकने घेतला. दुसऱया सेटमध्ये तिने पूर्ण वर्चस्व राखत 5-0 अशी झटपट आघाडी घेतली आणि 86 मिनिटात सामना संपवित तिने आगेकूच केली. तिची उपांत्यपूर्व लढत मर्केटा व्होन्डरूसोव्हा किंवा स्पेनची पॉला बॅडोसा यापैकी एकीशी होईल.
केनिन, स्टीफेन्सची आगेकूच, ब्रॅडीची माघार
अमेरिकेच्या चौथ्या मानांकित सोफिया केनिनने आपल्याच देशाच्या जेसिका पेगुलावर 4-6, 6-1, 6-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळवित चौथी फेरी गाठली. महिला एकेरीत टॉप पाचमधील केनिन ही एकमेव खेळाडू स्पर्धेत उरली आहे. पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाला झेकच्या बार्बरा क्रेसिकोव्हाकडून 3-6, 2-6 असा पराभवाचा धक्का बसला. विद्यमान विजेती व आठवी मानांकित इगा स्वायटेकने चौथी फेरी गाठताना इस्टोनियाच्या ऍनेट कोन्टावेटवर 7-6 (7-4), 6-0 अशी मात केली तर स्लोअन स्टीफेन्सने 18 व्या मानांकित कॅरोलिना मुचोव्हाचे आव्हान 6-3, 7-5 असे संपुष्टात आणले. अमेरिकेच्या 17 वर्षीय कोको गॉफनेही शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. तिचीच देशवासी जेनिफर ब्रॅडीविरुद्ध तिने पहिला सेट केवळ 23 मिनिटांत 6-1 असा जिंकला होता. नंतर ब्रॅडीने वैद्यकीय मदत मागितली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिने सामना सोडून देण्याचा निर्णय घेतला. गॉफची पुढील लढत टय़ुनिशियाच्या 25 व्या मानांकित ऑन्स जेबॉशी होणार आहे. चौथ्या फेरीत अमेरिकेच्या चार महिलांनी स्थान मिळविले असून गॉफ, सेरेना, स्टीफेन्स, केनिन यांचा त्यात समावेश आहे.
नदालची नोरीवर मात
पुरुष एकेरीत विद्यमान विजेत्या तिसऱया मानांकित राफेल नदालनेही सोळाव्यांदा या स्पर्धेची चौथी फेरी गाठताना ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीवर 6-3, 6-3, 6-3 अशी मात केली. या वर्षात नदालने नोरीवर मिळविलेला हा तिसरा विजय आहे. नदाल येथील चौदावे व कारकिर्दीतील एकूण 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी त्याला आता इटलीचा 19 वर्षीय युवा खेळाडू यानिक सिनरशी लढत द्यावी लागणार आहे. 2005 मध्ये या स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर आजवर नदालने फक्त दोन सामने गमविले असून त्याने विजय मिळविलेला विक्रमी 103 वा सामना आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत नदालने सिनरला उपांत्यपूर्व फेरीत हरविले होते.
जोकोविच विजयी
जागतिक अग्रमानांकित जोकोविचने 93 व्या मानांकित लिथुआनियाच्या रिकार्डस बेरान्किसवर 6-1, 6-4, 6-1 अशी सहज मात करीत शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. बेरान्किसवर याआधी त्याने तीनदा विजय मिळविले होते. जोकोविचही 19 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याने सलग 12 व्या वर्षी या स्पर्धेची चौथी फेरी गाठली आहे. 2016 मध्ये त्याने ही स्पर्धा जिंकली होती. त्याची पुढील लढत युवा खेळाडू इटलीच्या लॉरेन्झो मुसेटीशी होणार आहे. मुसेटीने आपल्याच देशाच्या मार्को सेक्चीनाटोवर 3-6, 6-4, 6-3, 3-6, 6-3 अशी संघर्षपूर्ण मात केली. सराव करताना जोकोविच मुसेटीविरुद्ध खेळला आहे. मात्र प्रत्यक्ष सामन्यात त्यांची पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध गाठ पडणार आहे.
फेडररचा संघर्ष
स्विसच्या रॉजर फेडररला मात्र चौथी फेरी गाठण्यासाठी साडेतीन तास संघर्ष करावा लागला. त्याने जर्मनीच्या 59 व्या मानांकित डॉमिनिक कोएफरवर 7-6 (7-5), 6-7 (3-7), 7-6 (7-4), 7-5 अशी चार सेट्सच्या संघर्षानंतर मात केली. ग्रँडस्लॅममध्ये त्याने आजवर 424 सामने खेळले असून पहिल्या तीन सेट्समध्ये टायब्रेकपर्यंत संघर्ष करण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. पंधराव्या वेळी त्याने या स्पर्धेची चौथी फेरी गाठली असून त्याची पुढील लढत इटलीच्या मॅटेव बेरेटेनीशी होणार आहे.
फेडररचा माघारीचा निर्णय
माजी अग्रमानांकित रॉजर फेडररने प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे आयोजकांनी रविवारी सांगितले. त्याने तिसरी फेरी जिंकून चौथ्या फेरीत स्थान मिळविले होते. ‘माझ्या टीमसोबत चर्चा केल्यानंतर प्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून त्यानंतर वर्षाहून अधिक काळ त्यातून सावरण्यासाठी गेला आहे. अशा स्थितीत शरीराची पुरेशी साथ मिळत नाही. त्यामुळे अनेक स्पर्धा खेळण्याची घाई करणे योग्य ठरणार नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे,’ असे त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे पेंच टेनिस फेडरेशनने सांगितले.