- मृतांच्या नातेवाईकांना राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत जाहीर
ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील घोटावडे फाटा येथील रासायनिक कंपनीला आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी 37 कर्मचारी होते त्यापैकी 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.
पवार म्हणाले, अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आले नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल.
दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवले असून आज सकाळपासून पुन्हा एकदा अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंगचे काम सुरु आहे.