- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाची संभावित तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी दिल्ली सरकारने तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांची जाणवत असलेली कमी लक्षात घेऊन 5 आरोग्य सहकर्मचारी तयार करण्याचा प्लॅन केला आहे. या कर्मचाऱ्यांना प्राथमिक ट्रेनिंग दिले जाणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये केली.
- 5 हजार युवकांना दिले जाणार 2 आठवडे ट्रेनिंग
केजरीवाल म्हणाले, दिल्लीमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, त्याचा पुरवठा याची तयारी रुग्णालयात केली जात आहे. पण आता आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने 5 हजार आरोग्य सहकर्मचारी तयार करण्याचा आमचा प्लॅन आहे. 5 हजार युवकांना दोन आठवडे दिल्लीतील 9 मेजर मेडिकल इन्स्टिट्युटमध्ये प्राथमिक ट्रेनिंग दिले जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, हे युवक डॉक्टर आणि नर्सच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. होम केअर किंवा फर्स्ट एडमध्ये यांची मदत घेतली जाणार आहे. लस देणे, बीपी चेक करणे, डायपर चेंज करणे, नमुने घेणे आदी कामे 5000 ट्रेनी करतील. संबधित ट्रेनी जेवढे दिवस काम करतील त्याचा पगार देखील त्यांना दिला जाणार आहे. यासाठी 17 जूनपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- 12 वी उत्तीर्ण करू शकतील अर्ज
पुढे ते म्हणाले, आरोग्य सहकर्मचारी बनायचे असेल तर त्यासाठी 12 वी पास असणे आवश्यक आहे. या सोबतच 18 किंवा 18 पेक्षा अधिक वय असले पाहिजे. यामुळे तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी तयार होण्यास मदत मिळेल.