वाहनांसंदर्भातील कागदपत्रांना पुन्हा मुदतवाढ : रस्ते परिवहन मंत्रालयाची माहिती : कोरोनाच्या प्रभावामुळे निर्णय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशात कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा वाहनांशी संबंधीत कागदपत्रांच्या वैधतेचा कालावधी वाढविला आहे. यामुळे आता ड्रायव्हींग लायसन्स (डीएल), रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) आणि वाहनांचे परमिट व फिटनेस कागदपत्रे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ग्राहय़ धरण्यात येणार आहेत.
वैधतेचा कालावधी
1 फेबुवारी 2020 नंतर किंवा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत समाप्त होत असणाऱया वैध कागदपत्रांचा यामध्ये समावेश असणार आहे. याचा फायदा नागरिकांना होणार आहे. कोरोनाच्या काळात सामाजिक अंतराचे भान राखत आपल्या सेवांचा लाभ उठवता येणे नागरिकांना सोपे जाणार आहे.
सहाव्यांदा मुदत वाढ
कोरोनाची स्थिती लक्षात घेता सहाव्यांदा वाहनांसंदर्भातील कागदपत्रांच्या वैधतेची मुदत वाढविण्यात आली आहे. सर्वात अगोदर 30 मार्च 2020 रोजी ही मुदतवाढ घोषित करण्यात आली होती. त्यापाठोपाठ 9 जून 2020, 24 ऑगस्ट 2020, 27 डिसेंबर 2020, 26 मार्च 2021 रोजीदेखील ही मुदत वाढवण्यात आली आहे.