सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, 3.5 कोटी गुंतवणूकदारांचे बुडाले
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक कमकुवत बाजारांसह विक्रीवर दिलेल्या भराच्या कारणास्तव शेअर बाजार सोमवारी मोठय़ा प्रमाणात पडझडीला सामोरा गेला. या दरम्यान दिवसात गुंतवणूकदारांचे 3.5 कोटी रुपये बुडाले असल्याचे दिसून आले. सेन्सेक्सने 1100 अंकांनी घसरण नोंदवली आहे.
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पडझड दिसली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 1172 अंकांच्या घसरणीसह (2.01 टक्के) 57,166.74 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 302 अंकांच्या घसरणीसह (1.73 टक्के) 17,173.70 अंकांवर बंद झाला.
निफ्टीत आयटी कंपनी इन्फोसिसचे समभाग 7 टक्के घसरत बंद झाले होते. तर दुसरीकडे एनटीपीसीचे समभाग 6 टक्के तेजीसह बंद झाले होते. एचडीएफसी, एचडीएफसी बँकेचे समभाग घसरणीसह बंद झाले होते. चार दिवसांची दीर्घ सुट्टी घेतल्यानंतर सोमवारी शेअर बाजार घसरणीसहच खुला झाला. सकाळी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 979 अंकांच्या घसरणीसह 57,358 अंकांवर खुला झाला. विक्रीच्या कारणाने बाजारात सेन्सेक्स अगदी 1400 अंकांच्या खाली कोसळत 57 हजाराच्या खाली सेन्सेक्स पोहचला होता. टेक महिंद्रा, एचडीएफसी, एचडीएफसी बँक हे नुकसानीत होते. एनटीपीसी, एसबीआय लाइफ, टाटा स्टील, ओएनजीसी आणि नेस्ले यांचे समभाग मात्र नफ्यासह बंद झाले होते.
बाजारात चौफेर विक्रीला जोर आला होता. मागच्या आठवडय़ात बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 2,72,03,063.57 कोटी रुपयांवर होते, सोमवारी दुपारी 2 वाजता ते घटून 2,68,50,133.15 कोटी रुपयांवर आले. गुंतवणूकदारांना सोमवारी सुमारे 3.5 कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे.
आयटी क्षेत्रातील इन्फोसिससह इतर आयटी समभागांची विक्री दिसून आली. स्थानिक स्तरावर इन्फोसिस व टीसीएसचे निकाल आले आहेत पण ते अपेक्षेप्रमाणे नाहीत. त्यामुळेच समभाग घसरणीत होते. याच आठवडय़ात अमेरिकेतील कंपन्या आपले नफ्या-तोटय़ाचे निकाल जाहीर करणार आहेत. त्यापूर्वी गुंतवणूकदार विक्रीवर भर देत आहेत. वित्त कंपन्या, बँकांच्या समभागात विक्रीचा सिलसिला दिसला.
दुसरीकडे अमेरिकेतील बाजार घसरणीसह बंद झाले. आशियाई बाजारात विक्रीचा सिलसिला दिसला. निक्केई 293 अंकांनी तर कोस्पी निर्देशांक 2 अंकांनी घसरलेला होता. शांघाई कम्पोझीट 15 अंकांनी घसरणीत होता तर हँगसेंग मात्र 143 अंकांनी तेजीत होता.