संतोष करंडक फुटबॉल: ओडिशा-कर्नाटक लढत 3-3 गोलबरोबरीत
वृत्तसंस्था/ मलप्पूरम, केरळ
75 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपमधील ओडिशा व कर्नाटक यांच्यातील ब गटात झालेला चुरशीचा सामना 3-3 असा बरोबरीत राहिला तर मणिपूरने धक्कादायक निकाल देताना विद्यमान विजेत्या सेनादलाचा 3-0 असा पराभव केला.
ओडिशाने पहिला गोल नोंदवून कर्नाटकवर आघाडी घेतली. पण कर्नाटकने जोरदार प्रत्युत्तर देत तीन गोल नोंदवत ओडिशावर 3-1 अशी आघाडी घेतली. मात्र ओडिशाने दोन गोलांची पिछाडी भरून काढत अखेरीस 3-3 अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. या सामन्यात ओडिशाने प्रारंभापासूनच वर्चस्व ठेवले होते आणि 15 व्या मिनिटाला त्यांना पहिले यशही मिळाले. चंद्रा मुडुलीने पुरविलेल्या परफेक्ट क्रॉसवर जमिर ओरमने हा गोल नोंदवला. पिछाडीवर पडल्यानंतर कर्नाटकानेही आक्रमक धोरण स्वीकारल्यावर त्यांना लगेचच बरोबरी करण्याची संधी मिळाली होती. पण प्रशांतकडून मिळालेला पास सुधीर कोटिकेलाने वाईड फटका मारल्याने ही संधी वाया गेली.
30 व्या मिनिटाला सुधीर कोटिकेलानेच कर्नाटकला बरोबरी साधून दिली. 33 व्या मिनिटाला भाऊ निशादने ओडिशाच्या क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्यावर त्याने जोरदार फटका मारल्यावर चेंडू डिफ्लेक्ट होत जाळय़ात गेला. 60 व्या मिनिटाला कर्नाटकाने आपली आघाडी 3-1 अशी केली. सुधीरने गोलच्या दिशेने जबरदस्त ड्राईव्ह मारला आणि बेहराला तो अडविता आला नाही. सुधीरचा हा सामन्यातील दुसरा गोल होता. यानंतर ओडिशाने आक्रमणावर भर देत कर्नाटकच्या बचावफळीने केलेल्या चुकीचा लाभ उठवला. उजव्या बाजूने घेतलेल्या कॉर्नरवर विकास कुमार साहूने हेडरवर चेंडूला गोलजाळय़ाची अचूक दिशा देत संघाचा दुसरा गोल नोंदवला. काही क्षणानंतर ओडिशाने बरोबरी साधणारा तिसरा गोलही नोंदवला. चंद्रा मुडुलीने गोलजाळय़ाच्या वरच्या उजव्या कोपऱयात जोरदार फटका मारत हा गोल नोंदवला. कर्नाटकने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण ओडिशाचा गोलरक्षक चिन्मय शेखर बहाराने अप्रतिम गोलरक्षण करीत त्यांचे प्रयत्न फोल ठरवले. ओडिशाचा पुढील सामना मंगळवारी मणिपूरशी तर कर्नाटकचा सामना गुजरातशी होणार आहे.
मणिपूरचा सेनादलाला धक्का
दिवसातील धक्कादायक निकाल देताना मणिपूरने विद्यमान विजेत्या सेनादलाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात मणिपूरने सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण केले आणि पाचव्याच मिनिटाला त्यांना पहिले यश मिळाले. एन्गुलगौलाल सिंगसितचा पास बॉक्समध्ये आल्यानंतर सेनादलाच्या लुनमिनलेन हाओकिपने बचावात चूक केली आणि त्याने चेंडू एन.जेनिश सिंगच्या पुढय़ात मारला. त्याने तो गोलजाळय़ाच्या टॉप कॉर्नरवर मारत हा गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत मणिपूरने ही आघाडी कायम राखली. या सत्रात सेनादलाकडे जास्त काळ चेंडूचा ताबा होता. पण गोलच्या दिशेने त्यांना एकही फटका मारता आला नाही.
50 व्या मिनिटाला एका कॉर्नरवर लुनमिनलेन हाओकिपने उंच उडी घेत हेडरवर चेंडूला गोलजाळय़ाची दिशा देत दुसरा गोल केला आणि 75 व्या मिनिटाला मणिपूरने तिसरा गोल नोंदवून सेनादलाचा पराभव निश्चित केला. या गोलसाठी जेनिश सिंगने मिडफिल्डमधून गोलच्या जवळ असणाऱया थॉकचोम मनिचंद सिंगला पास पुरविला. मनिचंद त्यावर फटका मारण्याआधीच सेनादलाच्या बी. सुनीलने मधे येत चेंडू लाथाडला. पण तो त्यांच्याच गोलपोस्टमध्ये गेल्याने मणिपूरला हा बोनस गोल मिळाला.