वेगवान गोलंदाज हेजलवूड फायनलमधून बाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
सर्वांना उत्सुकता असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याला आता फक्त 2 दिवस शिल्लक आहे. अशातच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक सामन्यापूर्वी कांगारूंना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेजलवूड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. आयसीसीने ट्विट करत याची माहिती दिली आहे. हेजलवूडच्या जागी आता मायकल नेसरची संघात वर्णी लागली आहे.
आयपीएलमध्ये हेजलवूड आरसीबी संघाचा भाग होता. मात्र, साइड स्ट्रेनमुळे तो आयपीएल हंगाम संपण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. दरम्यान, हेजलवुड 16 जूनपासून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या पहिल्या अॅशेस कसोटीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हेजलवूडच्या जागी वेगवान गोलंदाज अष्टपैलू मायकेल नेसरचा संघात समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने नेसरचा संघात समावेश करण्यास मान्यता दिली आहे.
मायकेल नेसर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 33 वर्षीय नेसरने अलीकडच्या काळात कौंटी क्रिकेटमध्ये ग्लॅमॉर्गनसाठी 5 सामन्यात 19 विकेट घेतल्या, तसेच ससेक्सविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. मायकेल नेसरने आपल्या कारकिर्दीत फक्त दोनच कसोटी खेळल्या आहेत, परंतु अंतिम सामन्यात पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कसह त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
अॅशेस मालिकेसाठी हेजलवूड संघात कायम
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीनंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध अॅशेक् मालिका खेळायची आहे. पहिली कसोटी 16 जूनपासून होणार आहे. जोश हेझलवूड त्या संघात कायम आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले, ‘जोश पूर्ण फिटनेसच्या अगदी जवळ आहे, परंतु आगामी वेळापत्रकाप्रमाणे हा आमचा एकमेव कसोटी सामना नाही. यामुळे जोशला पहिल्या अॅशेस कसोटीसाठी तयारी करण्याची योग्य संधी मिळेल. 7 आठवड्यांत 6 कसोटी खेळल्या जाणार आहेत आणि वेगवान गोलंदाज खूप महत्त्वाचे असणार आहेत, असेही ते म्हणाले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियन संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.