शिरोडा : तिशे बोरी येथे लोकवस्तीजवळ असलेल्या बागायतीमध्ये मंगळवारी सकाळी मृत बिबट्या आढळून आला. साधारण अडीच वर्षांचा हा नर बिबट्या असून त्याच्या मृत्यूमागली नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिशे येथील विठोबा देवस्थान जवळच लोकवस्तीपासून साधारण तिनशे मीटरच्या अंतरावर हा बिबट्या सापडला. येथील विठोबा मंदिरच्या समोर असलेल्या कुळागरात एक झर व छोटी तळी आहे. उन्हाळ्यात या वाड्यावरील लोक पाण्यासाठी या झरीवर जातात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 6.30 वा. सुमारास काही स्थानिक नागरिक झरीवर गेले असता याठिकाणी मृतावस्थेत हा बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. हे वृत्त गावात पसरताच त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. वनखात्याला त्यासंबंधी कळविण्यात आल्यानंतर वन्यजीव विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन सकाळी 9.30 वा. सुमारास या मृत बिबट्याला ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी फोंड्यात आणले. पशुसंवर्धन खात्याच्या डॉक्टर्सकडून मृत बिबट्याची चिकित्सा केल्यानंतर संबंधित अहवाल वनखात्याच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात दोन बिबट्यामध्ये झालेल्या संघर्षात त्याचा मृत्यू झाल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या बिबट्याच्या मानेजवळ जखमांच्या काही खुणा सापडल्याने हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लोकवस्तीला लागूनच सुकन्ये हा वन्यपरिसर आहे. या डोंगरावरून बरीच रानटी जनावरी पाण्याच्या शोधात गावातील जलस्रोतांकडे वळतात. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. सुकन्ये डोंगराच्या पलिकडे सिद्धनाथ पर्वत असून त्याच्या पायथ्याशी असलेल्या शिरशिरे भागातही गेल्या आठ दिवसांपूर्वी येथील एका बागायतीमध्ये बछड्यासह बिबट्याची मादी दिसली होती.
Previous Articleकाणकोणात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिन उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.