संगणक, झेरॉक्स मशीनसमवेत अनेक गोष्टी जळून खाक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या मजल्यावरील संगणक, झेरॉक्स मशीन आणि काही दस्तऐवज जळून खाक झाले आहेत. परंतु या आगीमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. आगीच्या दुर्घटनेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे इमारतीत उपस्थित नव्हते.
दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालयाच्या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी आग लागल्याचे उघडकीस आले. आगीमुळे तेथील काही दस्तऐवज, झेरॉक्स मशीनसोबत काही संगणक जळाले आहेत. या दुर्घटनेवेळी वरिष्ठ अधिकारी कार्यालयात होते, परंतु कुणालाही ईजा झालेली नाही.
आग लागल्याचे कळताच अग्निशमन विभागाला तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाने तातडीने या आगीवर नियंत्रण मिळविले. एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालय तसेच कार्मिक मंत्रालय देखील आहे.