पणजी : सीमेपलीकडील आव्हानांवर मात करण्यासाठी बहुस्तरीय विकास बँकांचे बळकटीकरण आणि त्या विकसित करण्याची गरज अधोरेखित करत गोव्यात आयोजित तिसऱ्या जी 20 आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कृतीगटाच्या बैठकीचा बुधवारी समारोप करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत जी 20 सदस्य देश, निमंत्रित देश आणि बहुस्तरीय विकास बँकांसह (एमडीबी), विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुमारे 100 प्रतिनिधींचा सहभाग होता. आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कार्यगटाचे सह-अध्यक्षपद भूषवणाऱ्या फ्रान्स आणि कोरिया प्रजासत्ताक या देशांसह वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी संयुक्तपणे या बैठकीचे संचालन केले होते.
21 व्या शतकातील सामायिक जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुस्तरीय विकास बँक बळकट करणे, जागतिक कर्ज असुरक्षिततेवर उपाय शोधणे, जागतिक आर्थिक संरक्षक जाळ्याचे बळकटीकरण करणे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सामान्य एसडीआर वाटपाचा पाठपुरावा करणे, शाश्वत भांडवली ओघाच्या माध्यमातून आर्थिक लवचिकता बळकट करणे, आणि प्रमुख बँकांच्या डिजिटल चलनांच्या समग्र आर्थिक परिणामांचे मूल्यांकन करणे यासारख्या प्राधान्य क्षेत्रांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली. या बैठकीत हरित संक्रमण, हवामान संक्रमण, भांडवली जोखीम यासारख्या विषयांशी निगडीत वर्तमान समस्यांवर अतिशय फलदायी चर्चा झाली. बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी गोव्याच्या संस्कृतीचा आस्वाद घेतला. तसेच पाककलेच्या आदरातिथ्यासह भारताची सांस्कृतिक समृद्धता आणि विविधता देखील अनुभवली. त्यानंतर त्यांनी जुने गोवे येथील युनेस्को वारसा स्मारकांना भेटी दिल्या. त्यात बॅसिलिका ऑफ बॉम जीझस आणि म्युझियम ऑफ ख्रिश्चन आर्ट ची पाहणी केली. त्याचबरोबर पणजीतील फॉन्टेन्हास आणि साओ टोम भागांचीही सफर केली. बैठकीच्या निमित्ताने प्रतिनिधींसाठी योग सत्राचेही आयोजन करण्यात आले होते.