विविध कार्यक्रमांनिशी तीन दिवसीय महोत्सवाची सांगता : गोमंतकीयांसह पर्यटकांनी लुटला आनंद
पणजी : गोवा हेरिटेज फेस्टिव्हल 2023 मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय उपक्रमामध्ये संगीत, नृत्य, पाककृती आणि परंपरा या क्षेत्रातील गोव्यातील श्रीमंत वारसा सादर करण्यात आला. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली घरे, चर्च आणि इतिहासासाठी ओळखल्या जाणाऱ्या साळगाव या गावात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाद्वारे गोमंतकीय तसेच पर्यटक गोव्यातील समृद्ध वारशाचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आले होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भांगराळे गोंय हा निम-शास्त्रीय कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गोमंतकीय जीवनशैली, तसेच संस्कृतीचे दर्शन डॉ. पूर्णानंद चारी यांनी सांगातिक स्वरूपात सादर केले. तसेच मूळ साळगावचीच असलेल्या नामांकित गायिका लॉर्ना यांनी आपल्या लोकप्रिय कोंकणी गीतांचा नजराणा पेश करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर इम्पेरियल बँडने सादर केलेल्या संगीत कार्यक्रमाने दिवसांच्या आनंदाला कळस चढविला. तसेच लोकप्रिय गायिका सोनिया सिरसाट यांनीही गोमंतकीय गायनसंस्कृतीचा नजराणा पेश केला.
गोव्याचा वारसा साजरा करण्याच्या उद्देशाने पणजी शहरापासून काहीसे दूरवर असलेल्या साळगावमध्ये अनेक गोमंतकीय एकत्र आले होते, यातूनच गोव्याचा श्रीमंत वारसा ठळकपणे जाणवत होता. ‘गोवा हेरिटेज महोत्सवा’सारखे उपक्रम केवळ गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचेच प्रदर्शन करत नाहीत, तर राज्याच्या परंपरा साजरे करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र आणतात. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे सामूहिकेची जाणीव आणि अभिमानाची भावना वाढीस लागेल आणि भविष्यातील पिढ्यांना राज्याचा सांस्कृतिक वारसा आणि इतिहास पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळेल,” असा आशावाद राज्याचे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण तसेच मुद्रण व छापखाना विभागाचे मंत्री रोहन खवंटे यांनी व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी गोव्याच्या पारंपारिक पाककलेबाबत आयोजित स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. पाककला क्षेत्रातील नामवंत हस्तींनी या स्पर्धेचे परीक्षण केले. परिक्षकांमध्ये आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ फूड क्राफ्ट्स अँड कलनिरी सायन्सचे एक्झक्मियुटिव्ह शेफ आणि प्राचार्य शेफ अल्फोन्सो परेरा, गोमंतकीय खाद्यपदार्थांचे प्रेमी आणि खाद्यचिकित्सक श्री. सीझर यांचा समावेश होता. विजेत्यांना साळगावचे आमदार केदार नाईक यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘मोग आनी मोयपास’ हा कोंकणी तर ‘श्यामची आई’ हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला. 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी खास गोमंतकीय पोषाखाविषयक पॅन्सी डेस स्पर्धेचे आयोजन केले गेले. तसेच नाट्यागीत, भावगीत, मराठी-कोकणी कांतारा, निम-शास्त्रीय गीते अशी सुरेख संगीत मेजवानी परफेक्ट स्क्वेअर ऑर्केस्ट्राद्वारे सादर करण्यात आली. शाइन ऑन आणि क्लिक्स या बँडनी संगीतसाथ केली. एकूणच संपूर्ण महोत्सवात, पारंपरिक संगीत, नृत्याचे कार्यक्रम, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, हस्तकला व कारागिरी उत्पादनांची दालने आदी प्रकारे गोव्याच्या अनोख्या सांस्कृतिक वैविध्यतेची अनुभूती उपस्थितांना सतत येत होती. एकूणच गोव्यातील श्रीमंत वारशाची नव्याने अनुभूती देण्यामध्ये हा महोत्सव भलताच यशस्वी ठरला. स्थानिक आमदारांचे सहकार्य तसेच या महोत्सवात सहभागी गोमंतकीय व पर्यटकांनी दिलेली दाद यासाठी आयोजकांद्वारे सर्वांचे आभार मानण्यात आले.