प्रतिनिधी/साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याने १२ जणांना चावा घेतल्याची घटना गुरुवारी घडली. जखमींवर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
शांताराम नारायण चव्हाण (६४, रा. कुंभारवाडा वसाहत) हे लांजा गाडीची वाट पाहत कोंडगाव तिठा येथे उभे असताना त्यांच्यावर श्वानाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली, मात्र तिथे उभे असलेले रियाज देवळेकर यांनी श्वानाला हाकवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न श्वानाने केला. यामुळे साखरपावासीय भयभीत झाले आहेत. पिसाळलेल्या श्वानाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे श्वानाने चावा घेतलेल्या व्यक्तींना इंजेक्शन देऊन घरी पाठवले आहे. याबाबत साखरपा पोलीस स्थानकाला माहिती देण्यात आली आहे.