ओंडक्यावर सवार होत डोंगरावरून खाली येण्याची प्रथा
जपानच्या मध्य नगानो प्रांतातील सुवा भागात शनिवारी धोकादायक क्रीडापर्व ओनबशिरा पार पडले आहे. हा सण दर 6 वर्षांनी एकदा साजरा केला जातो. या उत्सवासाठी मोठय़ा संख्येत लोक एकत्र येत असतात. ओनबशिराला इंग्रजीत ‘द ऑनरेबल पिलर्स’ या नावाने ओळखले जाते.
ओनबशिरामध्ये हजारो लोक सामील होऊन या धोकादायक खेळात भाग घेतात. यादरम्यान 15-16 देवदार वृक्षांचे ओंडके आणले जात असतात. यातील प्रत्येकाचे वजन 10 टनापर्यंत असते. या ओंडक्यांना उंच पर्वतांच्या शिखरांवरून खालच्या दिशेने सरकविले जाते. हा प्रकार अत्यंत धोकादायक आणि प्रसंगी जीवघेणा ठरत असतो. तरीही लोक यात मोठय़ा संख्येत सामील होत असतात.
लोक यावर सवार होत ओंडक्यासह खालच्या दिशेने जाऊ लागतात. हा ओंडका सरकताना अनेक लोकांचा खाली पडून किंवा चिरडून मृत्यू देखील होत असतो. खाली आल्यावर या देवदारच्या ओंडक्यांना दोरखंडाद्वारे खेचून नदी पार करत चार पवित्र तीर्थस्थानापर्यंत नेण्याची प्रथा आहे.
ओनबशिरा सणाची सुरुवात हीयन काळात (794-1185) झाली होती. परंतु जपानच्या सुवा सिटी संग्रहालयाच्या इतिहासकारांचा मात्र वेगळा दावा आहे. हीयन काळापूर्वी नारा काळात (710-794) देखील लोक परंपरेच्या नावावर अशाप्रकारच्या धोकादायक खेळांचे प्रदर्शन करायचे असे त्यांचे म्हणणे आहे.