हर्षवर्धन श्रृंगला यांची घेतली जागा ः
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वरिष्ठ आयएफएस अधिकारी विनय मोहन क्वात्रा यांनी रविवारी भारताचे नवे विदेश सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. युक्रेन युद्धासमवेत विविध भूराजनयिक घटनाक्रमांना भारत तोंड देत असताना त्यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. जागतिक स्तरावर समीकरणे बदलत असताना भारतासमोरील आव्हाने अन् संधीं पाहता क्वात्रा यांना महत्त्वाची जबाबदारी पेलावी लागणार आहे.
1998 च्या तुकडीचे भारतीय विदेश सेवा अधिकारी क्वात्रा यांनी हर्षवर्धन श्रृंगला यांची जागा घेतली आहे. श्रृंगला हे शनिवारी निवृत्त झाले आहेत. विदेश सचिव म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी क्वात्रा हे नेपाळमधील भारताचे राजदूत होते.
विनय क्वात्रा यांनी रविवारी सकाळी विदेश सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. विदेश मंत्रालय विदेश सचिव क्वात्रा यांना एका यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत म्हटले आहे.
क्वात्रा यांना भारताच्या शेजारी देशांसह अमेरिका, चीन आणि युरोपसोबतच्या संबंधांचा तज्ञ मानले जाते. 2020 मध्ये नेपाळमध्ये राजदूत म्हणून नियुक्त होण्यापूर्वी ऑगस्ट 2017 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान फ्रान्समध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
32 वर्षांचा अनुभव बाळगणारे क्वात्रा यांनी ऑक्टोबर 2015 पासून ऑगस्ट 2017 दरम्यान पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव हे पद सांभाळले होते. जुलै 2013 ते ऑक्टोबर 2015 या कालावधीत त्यांनी विदेश मंत्रालयाच्या धोरण निर्मिती आणि संशोधन विभागाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर ते विदेश मंत्रालयात अमेरिकन विभागाच्या प्रमुख पदावर नियुक्त झाले, तेथील कार्यकाळात त्यांनी अमेरिका आणि कॅनडासोबतच्या भारताच्या संबंधांवर काम केले आहे.