लांबी नऊ फूट सहा इंच : कर्नाटकात एकूण तीन अजगर सापडले
कारवार : येथील अरबी समुद्रात मासेमारी करताना सर्वात मोठा बांगडा सापडल्याची घटना अगदी ताजी असतानाच कुमठा तालुक्यात पांढऱ्या रंगाचा अजगर आढळून आल्याची घटना घडली आहे. कर्नाटकात आजअखेर पांढऱ्या रंगाचे तीन अजगर आढळून आले आहेत. कारवार जिल्ह्यातील वनप्रदेशासह लोकवस्ती प्रदेशाला अजगराचे दर्शन वरचेवर होत असते. त्यामुळे जिल्हावासियांमध्ये तितकेसे कुतूहल आणि उत्सुकता दिसून येत नाही. तथापि आता पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ अजगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याशिवाय नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कुमठा तालुक्यातील गांधीनगर-हेगडे येथील देवी नारायण मुक्री यांच्या घरासमोर पांढऱ्या रंगाचा अजगर आढळून आला. अजगर दिसून आल्याची माहिती गणेश मुक्री यांनी सर्पमित्र पवन नाईक यांना दिली. नाईक यांनी तातडीने धाव घेत 9 फूट सहा इंच इतक्या लांबीचा तो अजगर पकडला आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. अजगराच्या अंगावर किरकोळ स्वरुपाच्या जखमा दिसून आल्या. वनखात्याने तो अजगर म्हैसूर येथील प्राणीसंग्रहालयाकडे पाठविला, असे सांगण्यात आले.
पांढऱ्या रंगाचे तीन अजगर आढळले
दरम्यान कर्नाटकात आजअखेर पांढऱ्या रंगाचे एकूण तीन अजगर आढळून आले आहेत. यापैकी दोन अजगार कारवार जिल्ह्यात आढळून आले आहेत. गेल्यावर्षी कुमठा तालुक्यातील मीर्जान येथे सर्पमित्र पवन नाईक यांनी पाच फूट लांबीचा पांढरा अजगर पकडून त्याचे रक्षण केले होते. तथापि आता आढळलेला पांढरा अजगर सर्वात मोठा असून गेल्यावर्षी सापडलेल्या अजगरापेक्षा दुप्पट आहे, असेही सांगण्यात आले.
नागरिकांनी भीती बाळगू नये…
पांढऱ्या अजगराबद्दल नागरिकांनी भीती बाळगू नये. हा साप विषारी नसतो. या जातीचे साप नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमचीच आहे. अजगर किंवा अन्य प्रकारचे साप दिसल्यास आपणाशी किंवा वनखात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सर्पमित्र पवन नाईक यांनी केले. यावेळी डीएफओ रवी शंकर, एसीएफ जी. रोहित, आरएफओ एस. टी. पटगार, प्रवीण नायक, गोपली जोली आदी उपस्थित होते.