कुस्ती जिंकून आल्यानंतर काळाचा घाला; कळंबा येथील प्रकार; मृत पैलवान पंढरपूर तालुक्यातील वाकरी गावचा; शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
दसऱ्यानिमित्त व्हनूर येथे झालेली कुस्ती जिंकून प्रशिक्षण केंद्रात परतलेल्या युवा मल्लाचा रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यु झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. मारूती हरिदास सुरवसे (वय 22, मूळ गाव- वाकरी, ता. पंढरपूर, सध्या राहणार कळंबा) असे या युवा मल्लाचे नाव आहे. 110 किलोचा भारदस्त युवा मल्ल असणाऱ्या मारूतीच्या अकस्मिक निधनाच्या वृत्तानंतर कुस्ती पंढरी कोल्हापूर नव्हे तर राज्याच्या कुस्ती जगतात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मारूतीच्या पार्थिवावर त्याच्या वाकरी गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुस्तीसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते.
कळंबा येथील राष्ट्रकुल क्रीडा संकुलात मारूती सुरवसे चार महिन्यांपूर्वी सरावासाठी दाखल झाला. 110 किलो वजन असलेला 22 वर्षीय मारूती वेगवान कुस्ती करण्यासाठी प्रसिद्ध होता. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते मल्ल आणि ज्येष्ठ प्रशिक्षक राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार महिने त्याचा सराव सुरू होता. या काळात त्याने ग्रामीण भागातील कुस्त्यातही चमक दाखविली होती. राष्ट्रकुल क्रीडा संकुलातील इतर मल्लांमध्येही दोन लाडका होता. सोमवारी कागल तालुक्यातील व्हनूर गावात दसऱयानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. या मैदानासाठी मारूतीने पूर्ण तयारी केली होती. अपेक्षेप्रमाणे त्याने या मैदानात कुस्ती लिलया जिंकली देखील. कुस्ती जिंकून मारूती कळंबा (कोल्हापूर) येथील राष्ट्रकुल क्रीडा संकुलात परतला. रात्री भोजन झाल्यानंतर झोपायला जाण्याआधीच सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या छातीत दुखण्यास सुरूवात झाली. त्रास होत असल्याने संकुलातील सहकारी मल्लांनी त्याला कळंबा येथील एका खासगी रूग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी मारूतीला तातडीने सीपीआर या शासकीय रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मारूतीला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मारूतीला मृत घोषित केले. चालत बोलत असणारा मारूती आपल्या डोळय़ासमोर गतप्राण झाल्याचे पाहून सहकारी मल्लांना धक्का बसला. मारूतीच्या निधनाची बातमी कुस्ती जगतात पसरल्यानंतर सीपीआरमध्ये मल्लांनी गर्दी केली होती. प्रशिक्षक राम सारंग यांनी शोकाकूल मल्लांना आणि मारूतीच्या मित्रांना धीर दिला. तसेच मारूतीच्या गावाकडे संपर्क साधून त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. रात्री उशिरा मारूतीचे नातेवाईक, मित्र परिवार वाकरी गावाकडून कोल्हापूरमध्ये दाखल झाला. शवविच्छेदनानंतर मारूतीचे पार्थिव त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात आले.
मारूतीच्या पार्थिवावर वाकरीत अंत्यसंस्कार
दरम्यान, कोल्हापुरात मारूतीचे पार्थिव वाकरी गावात नेण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुस्तीसह विविध क्षेत्रातील मान्यवर, वाकरी पंचक्रोशीतील नागरिक, कुस्तीप्रेमी उपस्थित होते. मारूतीच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
शेतकरी कुटुंबातील कर्ता मल्ल गेला
मारूती सुरवसे हा वाकरीतील शेतकरी कुटुंबातील. आई, वडील शेती करतात. शेती पावसावर अवलंबून. त्यामुळे घरची परिस्थिती तशी मध्यम. पण आपल्या मुलाला मल्ल करायचे या उद्देशाने त्यांनी मारूतीला प्रोत्साहन, पाठबळ दिले. मारूतीनेही आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत सराव करत चांगला मल्ल म्हणून लौकीक मिळवला. आता त्याच्या अकस्मिक जाण्याने सुरवसे परिवारावर दुःखाची कुऱहाड कोसळली आहे.
महाराष्ट्र केसरीच्या तोडीचा मल्ल ः राम सारंग
प्रशिक्षक राम सारंग यांनी मारूती सुरवसे हा महाराष्ट्र केसरीच्या धर्तीचा मल्ल होता. दररोज कसून सराव करणारा, आहार आणि व्यायामाचे नियम पाळणारा आणि प्रशिक्षकाने सांगितलेल्या शिस्तीत राहणारा असा मारूती पैलवान होता. भविष्यात त्याने महाराष्ट्र केसरीची गदाही जिंकली असती, अशी प्रतिक्रिया पाणावलेल्या डोळय़ांनी राष्ट्रकुल कुस्ती प्रशिक्षक केंद्राचे सर्वेसर्वा राम सारंगी यांनी दिली.