प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून पोलिसांची शोधमोहीम
वार्ताहर/कराड
कराड-विद्यानगर रस्त्यावरील कृष्णा पुलावरून एका युवकाने नदीत उडी मारल्याची घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी नदीत शोधमोहीम राबवली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत काहीच निष्पन्न झाले नाही. यावेळी पुलावर मोठय़ा प्रमाणात बघ्यांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास एसजीएम कॉलेजचे दोन विद्यार्थी कॉलेजवरून सायकलने कराड शहराकडे निघाले होते. विद्यार्थी कृष्णा पुलावर आल्यानंतर त्यांच्या पुढे एक युवक चालत कराड शहराकडे निघाला होता. पुलाच्या मध्यावर आल्यानंतर त्या युवकाने पुलावरून नदीत उडी मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.
उडी मारून बुडालेला युवक वर आल्यानंतर पोहण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी तो तीन वेळा पाण्यात बुडाला व पुन्हा वर आला. यावेळी प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पुलावरून बुडणाऱया युवकाला हाका मारल्या व किनाऱयाकडे येण्यास सांगितले. प्रत्यक्षदर्शीतील एक विद्यार्थी त्याला मदत करण्यासाठी धावत पुलाच्या खाली गेला. मात्र तिसऱयावेळी पाण्यात गेलेला तो युवक पुन्हा वर आलाच नाही. पुलावर चाललेला आरडाओरडा पाहून पुलावरून ये-जा करणाऱया नागरिकांनी पुलावर गर्दी केली.
या घटनेची माहिती मिळताच प्रथम वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पुलावर दाखल झाले. वाहतूक पोलिसांनी या घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी नदीत शोधमोहीम राबवली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत काहीच निष्पन्न झाले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार त्या युवकाने निळसर रंगाचा शर्ट घातला होता. तर पायात चप्पल होती. तो महाविद्यालयाचा विद्यार्थी असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने पोलिसांनी नदीत शोध घेतला. मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. तर रात्री उशिरापर्यंत या घटनेची अथवा बेपत्ता झाल्याची नोंद कराड शहर पोलिसांत झालेली नव्हती. पुलावर झालेल्या बघ्यांच्या गर्दीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांनी बघ्यांना हटकल्यानंतर पुलावरील गर्दी कमी झाली.