बेळगाव रेल्वेस्थानकात पिलरची उभारणी : वरिष्ट अधिकाऱयांकडून कौतुक
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकातील विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या येथील स्थानकात लोखंडी पिलर उभे केले जात असून त्यानंतर विद्युतवाहिन्या घातल्या जाणार आहेत. रेल विकास निगम लि. व सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युतीकरण करण्यात येत आहे.
लोंढा-मिरज-बेळगाव या विभागात घटप्रभा-कुडची या 49 कि. मी. मार्गाचे प्रथमतः विद्युतीकरण करण्यात आले. कुडची-घटप्रभा या विद्युतीकरणाची लोकोटेल तपासणी 28 मार्चला घेण्यात आली. 110 कि. मी. प्रतितास वेगाने इलेक्ट्रिक इंजिनवर या मार्गावरून रेल्वे धावली. 28 मार्च 2022 पर्यंत नैर्त्रुत्य रेल्वेअंतर्गत 511 कि.मी. चे विद्युतीकरण करण्यात आले होते. 2021-22 या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाने 459 कि. मी. चे लक्ष्य ठेवले होते. ते पूर्ण केल्याने वरि÷ अधिकाऱयांकडून कौतुकाची थाप मिळाली.
नैर्त्रुत्य रेल्वे विभागात येलहंका-चिक्कबळ्ळापूर (45 कि. मी.), शिवडी-ओमलूर (44 कि. मी.), तुमकूर-निट्टूर (27 कि. मी.), कुडची-घटप्रभा (47 कि. मी.), अळणावर-आंबेवाडी, दांडेली (26 कि. मी.), लोंढा-तिनईघाट (11 कि. मी.), गदग-होले आलूर (48 कि. मी.), होसदुर्ग-चिकजाजूर (30 कि. मी.) रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱया काळात विद्युत रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दुसऱया दिवशीही रेल्वेची स्पीड ट्रायल
मिरज ते लोंढा या दरम्यान केल्या जात असलेल्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दरम्यान असणाऱया बेळगाव-सुलधाळ या 27 कि. मी. च्या रेल्वेमार्गाची स्पीड ट्रायल दुसऱया दिवशीही घेण्यात आली. मंगळवारी नैर्त्रुत्य रेल्वेचे हुबळी विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे उपस्थित होते.
रेल्वेची गती वाढावी व प्रवासाचा कालावधी कमी व्हावा, यासाठी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण केले जात आहे. यामुळे क्रॉसिंगसाठी कुठेही रेल्वे थांबणार नाही. बेळगाव विभागात सध्या बेळगाव-सुलधाळ या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले असून सोमवार व मंगळवारी दोन दिवस स्पीड ट्रायल व बेंगळूर येथील विशेष पथकाकडून मोटारट्रॉली इन्स्पेक्शन करण्यात आले.
ताशी 120 कि. मी. वेगाने नव्या मार्गावरून इंजिन धावले. स्पीड ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आता एक्स्प्रेस रेल्वे यावरून धावणार आहेत.