आष्टा/प्रतिनिधी
सांगली इस्लामपूर रस्त्यावर गोटखिंडी फाट्याजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने मोटरसायकलला धडक देवून झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये पिता-पित्राचा समावेश असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अंकुश शिवाजी साळुंखे (वय 40), आदित्य अंकुश साळुंखे (वय 13) दोघे राहणार राजारामनगर हजारमाची, ता.वाळवा असे या अपघातात ठार झालेल्या पिता-पित्राचांची नावे असून सोनाली अंकुश साळुंखे (वय 35) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिला मयताची पत्नी आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी हिरोहोंडा सीडी डिलक्स मोटरसायकल क्रमांक (एम.एच. 50 आर. 1676) वरुन अंकुश साळुंखे, आदित्य साळुंखे व सोनाली साळुंखे हे इस्लामपूरच्या दिशेने जात असताना गोटखिंडी फाट्याजवळील वळणार भरधाव वेगाने सांगलीच्या दिशेने जात असलेल्या अज्ञात डंपरने मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत अंकुश साळुंखे आणि आदित्य साळुंखे यांची मुंडकी धडावेगळी झाली. तर सोनाली साळुंखे या रस्त्याच्या बाहेर फेकल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या. पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा पोलीस अधिक तपास करत आहेत.