दोन दवाखान्यावर आरोग्य विभागाचा छापा; औषधे व उपचार साहित्य जप्त
सरवडे प्रतिनिधी
अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय चालू असल्याच्या संशयावरुन जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने आज बिद्री ( ता. कागल ) येथील डॉ. वाय.पी. पाटील यांच्या श्रद्धा हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यावर छापा टाकून कारवाई केली. दरम्यान बिद्री येथीलच डॉ. के.डी. फराकटे यांच्या जीवनदीप नर्सिंग होम या हॉस्पिटलचीही संशयावरुन तपासणी करण्यात आली. या कारवाईतील संबंधित डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्याचे काम मुरगूड पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसुतीपूर्व निदान तंत्रे ( लिंग निवडीस प्रतिबंध ) कायद्याची व वैद्यकीय गर्भपात कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाच्या पथकाने बिद्रीवर दोन खाजगी दवाखान्यांवर छापा टाकत अवैधरित्या सुरु असलेल्या डॉक्टरांवर कारवाई केली.
बिद्री कारखाना साईटवर डॉ. वाय. पी. पाटील यांचा श्रद्धा हॉस्पिटल नावाचा खाजगी दवाखाना आहे. आरोग्य विभाग आणि शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय येथे रुग्णांची तपासणी केली जात होती. आज या दवाखान्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात केलेल्या झाडाझडतीत संशयास्पद कागदपत्रे आणि रजिस्टर यांची संबधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तर दवाखान्यातील औषधांचा साठा आणि अन्य साहित्य आरोग्य
विभागाच्या पथकाने जप्त केले.
याशिवाय बिद्रीवरीलच डॉ. के. डी. फराकटे यांच्या जीवनदीप नर्सिंग होम या खाजगी दवाखान्यावरही आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकून तपासणी केली. यावेळी कारवाईच्या भितीने डॉक्टरांनी दवाखाना सोडून पलायन केले. संबंधित डॉक्टरांवर मुरगूड पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
या कारवाईत जिल्हा रुग्णालयाच्या बाहयरुग्ण संपर्क अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, कागल चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिता पाटील, मुरगूडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान डवरी, कागल तालुका आरोग्यधिकारी डॉ. अभिजित शिंदे, जिल्हा कायदा सल्लागार अॅड. गौरी पाटील, पिंपळगाव प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. नेहा शेवाळे व त्यांचा स्टाफ यांनी सहभाग घेतला मुरगूडचे सपोनि विकास बडवे, सहा. पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्यासह कर्मचारी दिवसभर घटनास्थळी उपस्थित होते.
यापूर्वीही झाली होती कारवाई …..!
डॉ. वाय. पी. पाटील यांच्या श्रद्धा हॉस्पिटल या दवाखान्यात अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात केंद्र चालविले जात असल्याच्या संशयावरुन यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. २००९ साली केलेल्या कारवाईत त्यांना वैद्यकीय सेवा देण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु कोणत्याही परवानगीशिवाय हा अवैध व्यवसाय करत असल्याची चर्चा होती. आजच्या कारवाईने परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून अनेकांनी आज दवाखाने बंद ठेवले होते.