सन 2019 साली 29सदस्यांचे संचालक मंडळ होते कार्यरत : गेटवरील सुरक्षारक्षकांना निवारा शेडची गरज ,घुमट आरती, फुगडी, ऐतिहासिक व संगीत नाट्या स्पर्धाचे सातत्याने आयोजन
फेंड़ा : फोंड्यातील कला व नाट्याप्रेमींसाठी विरंगुळ्याचे एकमेव साधन म्हणजे राजीव गांधी कला मंदिर होय. कोरोना महामारीच्या काळापुर्वीपासून पणजी येथील कला अकादमी दुरूस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आली त्यानंतरही उत्तर गोव्याच्या कलाप्रेमींचे चोचले पुरविले ते अंत्रुज महालातील राजीव कला मंदिरनेच. सद्या कला मंदिराचा कारभार अध्यक्षाविना हाताळण्याची वेळ येत असल्यामुळे नवनवीन उपक्रमातही खंड पडत असल्याचे दिसून येत आहे. कला व संस्कृती खात्याने यासाठी त्वरीत हालचाली कराव्या अशी कलाकांरानी मागणी केली आहे. फेंड्यातील राजीव कला मंदिर म्हणजे अंत्रुज महालातील कलाकारांसाठी मोठे व्यासपीठ आहे. शिरोडा-पंचवाडी, बांदोडा-मडकई, प्रियोळ-माशेल, बेतोडा-दाभाळपर्यत रसिकांसाठी उपलब्ध असते. चतुर्थीकाळात घुमटगाज सुरू असताना कला मंदिर आणि राज्यस्तरिय घुमट आरती वादन स्पर्धा असे समिकरणच झालेले आहे. या स्पर्धेला राज्यभरातील घुमट आरती वादक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून त्याना संपुर्ण राज्यातील रसिकही तेवढ्याच ताकदीने पाठिंबा दर्शवित असतात.
राजीव कला मंदिरच्या वर्षभरात होणाऱ्या प्रमुख स्पर्धा
- 14 वर्षापासून राज्यस्तरिय महिला फुगडी स्पर्धा,
- 13 वर्षापासून राज्यस्तरिय घुमट आरती वादन स्पर्धा,
- 8 वर्षापासून स्व. किशोरीताई हळदणकर महिला संगीत नाट्या स्पर्धा
- 3 वर्षापासून स्व. रविंद्र लक्ष्मण नाईक स्मृतिप्रित्यर्थ ऐतिहासिक नाट्या स्पर्धा,
- 2 वर्षापासून महिला घुमट आरती वादन स्पर्धा घेतल्या जात आहेत.
त्यानंतर हल्लीच युवा कलाकारांना प्रोत्साहन व जुने कलाकारांना आदरांजली वाहण्याचा सतरंगी सारखे कार्यक्रम सादर करण्यात आलेले आहे. यावेळी अंत्रुज महालातील एकूण दहा दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहण्यात आली. त्dयाशिवाय कला अकादमीच्या राज्यस्तरिय भजन स्पर्धेचेही यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. राजीव गांधी कला मंदिरची पायाभरणी सन 1992 साली झाली होती. या वास्तूचे काम सन 2004 साली पुर्ण झाले. त्यानंतर केवळ नऊ वर्षाच्या कालखंडानंतर मुख्य सभागृहाच्या दालनाची आसनव्यवस्था वाढविणे व इतर अंत्याधुनिक उपाययोजनेसाठी दुरूस्तीकामासाठी कला मंदिर बंद ठेवण्यात आले. त्यानंतर सन 2016 साली पुन: रसिकांसाठी खुले करण्यात आले. मुख्य सभागृहाची 750 असलेली आसनव्यवस्था वाढवून 1050 करण्यात आली. त्यानंतर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी खात्याची धुरा सांभाळल्यानंतर कला मंदिरात दोन राज्यस्तरिय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. कला मंदिरात सद्या मा. दत्ताराम नाट्या सभागृहासह, खुला सभागृह, एरेना थिएटर, तालीम कक्ष, संगीत वर्ग, अशा विविध सुविधा कला मंदिर पुरवित आहे. क् एरेना थिएटर हे कला अकादमीच्या थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे.
तीन वर्षापासून राजीव कला मंदिर अध्यक्षाविना
सद्यपरिस्थिती राजीव कला मंदिर अध्यक्षाविना कारभार हाकत आहे. कोरानानंतर संचालक मंडळाची निवड झालेली नाही. सन 2019 साली कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 29 सदस्याचे संचालक मंडळ कार्यरत होते. त्यानंतर कला मंदिर आजपर्यत अध्यक्षाविना कारभार हाकत आहे. समितीच्या निवडीसाठी कला व संस्कृती गोविंद गावडे याच्यांशी जाणून घेतल्यास संचालक मंडळाच्या निवडणूकीचे अधिकार मुख्यमंत्र्याच्या आखात्यारित्या येत आहेत. यासंबंधी फाईल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पोचविण्यात आली असून येत्या दिवसात कला मंदिरच्या समितीसाठी प्रक्रीयाही सुरू होणार असल्याची माहिती मंत्री गावडे यांनी दिली.
सुरक्षारक्षक ड्युटी बजावतात उन पावसात
उन पावसात कला मंदिरच्या गेटवर ड्यूटी बजावणाऱ्या सुरक्षारक्षकांना निवारा शेडअभावी त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या सोयीसाठी गेटवर एक निवारा शेड उभारण्यात येणेही गरजेचे आहे. याप्रश्नी जीएसआडीसीकडे संपर्क साधल्याचे कला मंदिरचे सदस्य सचिव स्वाती दळवी यांनी सांगितले. कला मंदिरसाठी आरक्षित करण्यात आलेली समोरील पार्किग तळाची डागडुजी व्हावी, मुख्य सभागृहातील ध्वनीयंत्रणा पुर्ववत बसविण्यात येणार आहे. पणजी येथील कला अकादमी बंद असल्याने राजीव कला मंदिरावर ताण पडत आहे ही गोष्ट खरी असली तरी कला मंदिरात नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी कला मंदिरवर संचालक मंडळाची नेमणूक होणेही तेवढेच गरजेचे आहे. फोंडा तालुक्यातील ग्रामिण भागातील कलाकारांनाही आपले मत मांडणे, त्यानुसार बदल व सुविधा करणे अशा अनेक बाबींवर मुक्त संवाद संचालक मंडळ नेमल्यानंतर होत असतो असे सदस्य सचिव स्वाती दळवी यांनी सांगितले.