मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने मद्य धोरण प्रकरणी रविवारी सायंकाळी अटक केली आहे. अटकेपूर्वी सीबीआयने त्यांची 8 तास चौकशी केली. आता त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. सिसोदिया यांच्या अटकेवर आम आदमी पक्षाने कडक शब्दात टीका केली आहे. सिसोदिया यांची अटक ही हुकूमशाही असल्याचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले. तसेच हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे ट्विट आम आदमी पक्षाकडून करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी सीबीआय कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाटावरील समाधीस्थळी पोहोचले होते. महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर रोड शो करत ते सकाळी अकराच्या सुमारास सीबीआय कार्यालयात पोहोचले. सीबीआय कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी अटक होण्याची भीती व्यक्त केली होती. दिल्लीतील कथित मद्य घोटाळय़ाप्रकरणी सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण 2021 मध्ये सादर केलेल्या दिल्लीच्या नवीन मद्य विक्री धोरणाशी संबंधित आहे. केजरीवाल सरकारने 2021 मध्ये मद्यविक्रीसाठी तयार केलेल्या धोरणामध्ये कथित घोटाळय़ाचा आरोप आहे.
आयएएस अधिकाऱयाच्या जबानीमुळे सिसोदिया अडकले
उत्पादन शुल्क विभागाच्या एका आयएएस अधिकाऱयाने चौकशीदरम्यान सिसोदिया यांचे नाव घेतल्यानंतर ते चौकशीच्या फेऱयात अडकले होते. सिसोदिया यांनी मद्य धोरण बनवले असून या धोरणामुळे सरकारला फायदा होत नाही, व्यापाऱयांना मोठा फायदा होतो. या वक्तव्याच्या आधारे सिसोदिया यांची चौकशी करण्यात आली. सदर अधिकाऱयाने सिसोदिया यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोपही केला होता. सीबीआयने सिसोदिया आणि आयएएस अधिकाऱयाची आमनेसामनेही चौकशी केली. त्यात ठोस धागेदोरे मिळाल्यामुळे आणि सीबीआयच्या प्रश्नांना पूरक उत्तरे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे अखेर सिसोदिया यांच्यावर अटकेची कारवाई झाली.
सीबीआयसमोर जाताना ‘शक्तिप्रदर्शन’
चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात जातेवेळी घर सोडण्यापूर्वी सिसोदिया यांनी त्यांच्या आईची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर रोड शो करत ते सीबीआय कार्यालयात पोहोचले. सिसोदिया यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थक होते. सर्वजण मुख्यालयाजवळ धरणे धरून बसले आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. वाढता विरोध पाहून पोलिसांनी कलम 144 लागू केले. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय आणि आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीबीआय कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी समर्थकांना संबोधित केले.
दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांना आरोपपत्रात आरोपी करण्यात आलेले नसले तरी ते संशयाच्या भोवऱयात असून त्यांची यापूर्वी अनेकवेळा चौकशी झालेली आहे. ते तपास यंत्रणांच्या रडारवर आल्यामुळे ठोस धागेदोरे सापडताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
आपल्यावरील कारवाईसंबंधी सिसोदिया यांनी यापूर्वी कठोर भाष्यही केले आहे. ‘सीबीआय आणि ईडीने माझ्याविरोधात पूर्ण ताकद लावली आहे. यापूर्वी घरावर छापे टाकले आहेत, बँक लॉकरची झडती घेतली आहे, पण माझ्याविरोधात आतापर्यंत काहीही सापडले नाही. छापे पडल्यानंतरही तपासात मी नेहमीच सहकार्य केले असून यापुढेही तपास यंत्रणांना योग्य उत्तरे देईन, असे सिसोदिया यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. याचदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मद्य घोटाळय़ासारखे काहीही झाले नाही. हा विरोधी पक्षाने निर्माण केलेला राजकीय मुद्दा आहे. आतापर्यंत सीबीआय आणि ईडीला तपासात काहीही सापडलेले नाही, असे म्हटले होते. मात्र, आता अटकेची कारवाई झाल्यामुळे त्यांची तुरुंगवारी निश्चित मानली जात आहे.