जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर 2022-23 ची कामे होणार सुरु; पुढील पाच महिन्यात मंजूर निधी खर्च करण्याचे आव्हान
कृष्णात चौगले कोल्हापूर
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील राज्यातील सर्व मंजूर विकासकामे स्थगित केली होती. परिणामी गेल्या तीन महिन्यांपासून जिह्यातील कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. पण पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर 2021-22 अर्थिक वर्षातील स्थगित कामे आता पुन्हा सुरु केली आहेत. त्यामुळे विकासकामांना पुन्हा गती आली आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 2022-23 मधील विकासकामांची यादी मंजूर केल्यानंतर चालू अर्थिक वर्षातील कामे देखील सुरु होतील. पण येत्या पाच महिन्यांत हा निधी खर्च करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार सुरु झाल्यानंतर एप्रिल 2021 पासून महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या दिवसापर्यंत निविदा न झालेली कामे स्थगित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा नियोजन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे आदी सर्व शासकीय विभागांमार्फत मंजूर झालेली पण निविदा न झालेली कामे स्थगित करण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात वर्कऑर्डर मंजूर झालेल्या विकासकामांखेरीज अन्य कोणतेही काम नव्याने सुरु झाले नाही. जिह्यातील ग्रामीण, जिल्हा मार्ग तसेच राज्य मार्गासह शाळा, अंगणवाडीसह प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींबरोबरच अन्य प्रशासकीय इमारतींची कामे ठप्प झाली होती. सत्तांतराच्या या गोंधळात विकासकामांचा बटय़ाबोळ उडाला आहे.
जिल्हा नियोजनची 335 कोटींची कामे होणार सुरु
जिल्हा नियोजन विभागाच्या 425 कोटींच्या आराखडय़ातील चालू अर्थिक वर्षातील सुमारे 10 कोटी आणि गत अर्थिक वर्षातील 90 कोटी अशी सुमारे 100 कोटींची कामे वगळता 325 कोटींच्या विकासकामांना शासन निर्णयामुळे ब्रेक लागला होता. ही कामे आता नव्याने सुरु होणार आहेत.
ग्रामविकासाला मिळणार चालना
शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जाणाऱया सुमारे 25 कोटींच्या कामांना स्थगिती मिळाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते, गटर्स, सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, शाळांची संरक्षण भिंत, सुविधा गृह, मैदान सपाटीकरण, बागबगीचा, ओपन जीम यासह गावांत अन्य मुलभूत सुविधा व इतर विकासकामे रखडली होती. पण राज्यशासनाने स्थगिती उठवल्यानंतर आता ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.
शिंदे सरकारमधील आमदार, खासदारांना मिळणार भरघोस निधी
कोल्हापूर जिह्यातील शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भरघोस निधीचे गिफ्ट मिळणार आहे. तसेच शिंदे गटात सहभागी झालेल्या माजी आमदारांनाही निधी दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
पुढील आठवडय़ात जिल्हा नियोजनची बैठक शक्य
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक 12 ऑक्टोबरला होणार असल्याची चर्चा होती. पण ही बैठक पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये पालकमंत्री केसरकर यांच्या शिफारसीनुसार 2022-23 मधील विकासकामांना मंजूरी दिली जाणार आहे.
ग्रामपंचायत इमारतीची कामे अद्याप स्थगित
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत जिह्यातील 48 ग्रामपंचायत इमारत बांधणीची मंजूर कामे शिंदे सरकारने स्थगित केली. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत इमारतीसाठी 18 लाखांचा निधी मंजूर आहे. जिह्यातील अन्य कामांची स्थगिती उठवली असली तरी या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधणीची कामे अद्याप स्थगित आहेत. भविष्यात या योजनेच्या नावात बदल करून ही कामे सुरु केली जाण्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.