जागतिक दौऱ्यादरम्यान भारतात आल्यानंतर ‘क्वारंटाईन’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक बँकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार अजय बंगा यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारत दौऱ्यावर दाखल झाल्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत ते ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले. आपल्या भारत दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार होते, मात्र त्यापूर्वीच ते कोरोनाच्या नियमित चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यामुळे संबंधितांसोबतची बैठक रद्द करण्यात आली आहे.
बंगा आपल्या तीन आठवड्यांच्या जागतिक दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात भारतात पोहोचले आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यांनी यापूर्वी आफ्रिका, युरोप, लॅटिन अमेरिकेचा प्रवास केला असून तिथे त्यांनी सरकारी अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक नेते, विकास तज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेत्यांची भेट घेतली आहे.
दिल्लीत येण्यापूर्वी बंगा यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ होता. परंतु पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना स्थानिक मार्गदर्शक सूचनांनुसार क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या त्यांना प्रकृतीचा कोणताही त्रास जाणवत नसला तरी वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अजय बंगा जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना गेल्या महिन्यात नामनिर्देशित केले. या पदासाठी नामांकन मिळालेले ते भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत. 63 वषीय भारतीय-अमेरिकन बंगा हे सध्या खासगी इक्विटी फंड जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत.