पवन बन्सल यांच्या जागी नियुक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अजय माकन यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी रविवारी यासंबंधी निवेदन जारी करत अधिकृत घोषणा केली. हा निर्णय तात्काळ लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे पद यापूर्वी पक्षाचे नेते पवन बन्सल यांच्याकडे होते.
काँग्रेस पक्षात सध्या परिवर्तनाचा काळ सुरू आहे. पक्षाची कमान मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आल्यानंतर अलीकडेच नवी राष्ट्रीय कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली होती. आता आणखी एक मोठा बदल करण्यात आला असून माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांची पक्षाचे नवे खजिनदार किंवा कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पदावर नव्या नेत्याची नियुक्ती करण्याची चर्चा सुरू होती. अखेर रविवारी ही जबाबदारी अजय माकन यांच्याकडे सोपवण्यात आली. यापूर्वी अजय माकन हे राजस्थान राज्याचे पक्षप्रभारी होते. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर त्यांनी नोव्हेंबरमध्ये हे पद सोडले होते. यानंतर माकन पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत असतानाच आता त्यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी आल्याने त्यांचा मान उंचावल्याचे दिसून येते.