वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
केरळ येथे घेण्यात आलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत बेळगावच्या अक्षता कामती हिने 84 किलो स्नॅच व 116 किलो जर्क किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले आहे.
केरळ येथे अखिल भारतीय पातळीवरील खेलो इंडियाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत संपूर्ण भारतातून जवळपास 18 हून अधिक अव्वल वेटलिफ्टर्सनी सहभाग घेतला होता. प्रारंभी अक्षताने 72 स्नॅच व 102 जर्क उचलून अव्वल स्थान मिळविले होते. पण शेवटच्या प्रयत्नात तिने 84 स्नॅच व 116 जर्क उचलून प्रथम क्रमांक पटकाविला. 6 जानेवारी रोजी नागरकोळी, तामिळनाडू येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत अक्षताने 85 स्नॅच व 123 किलो जर्क वजन उचलून प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले होते. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली होती. यापूर्वीही अक्षताने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चमक दाखवून सुवर्णपदक पटकाविली आहेत. तिला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक वीर पाल, श्यामला शेट्टी व बेळगावचे वेटलिफ्टर प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.