रिव्होल्युशनरी गोवन्स चा आरोप
प्रतिनिधी / पणजी
गेल्या विधानसभा अधिवेशनात रेव्होल्युशनरी गोवन्सतर्फे पोगो खासगी विधेयक चर्चेस घेण्यासाठी पाठवले होते. पण एकही दिवस ते बिल चर्चेसाठी घेतले नाही, किंवा एकाही आमदाराने त्यावर चर्चा केली नाही. परंतु कुडतरीचे आमदार आलेक्स लॉरेन्स यांनी आपण हे बिल यापूर्वी अधिवेशनात मांडण्यासाठी दिले होते असे म्हटले होते, परंतु आलेक्स लॉरेन्स गोव्यातील जनतेच्या भावनाशी खेळ खेळत आहेत, असा आरोप रेव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी केला आहे.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या विधेयकाच्या नावाने खोटे बोलून आलेक्स यांनी विधानसभेचे पवित्र सभागृह अपवित्र केले आहे, तसेच यावेळीही त्यांनी आपण पोगो विधेयक मांडले असल्याचे खोटे विधान करून जनतेची उघड उघड फसवणूक केली आहे. परंतु आम्ही चौकशी केली तेव्हा ते खोटे असल्याचे दिसून आले असे आर.जी. चे प्रमुख मनोज परब म्हणाले.
आमचा क्रांतिकारी आमदार विधानसभेत पोहोचला आहे तो काही आमदारांची खोटी भाषणे ऐकण्यासाठी नव्हे तर जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी आहे, असे ते पुढे म्हणाले. आमदार आलेक्स जर खर बोलत असतील तर त्यांनी पोगो बिल दिल्याचे सिद्ध करून दाखवावे. उगाच जनतेची दिशाभूल करू नये, असे आव्हान परब यांनी दिले.