वृत्तसंस्था /नवी दिल्ली
वाडिया समूहाच्या मालकीची हवाई कंपनी गो फर्स्टच्या अडचणी संपता संपेना झाल्या आहेत. 12 जून पर्यंत गो फर्स्टची सर्व विमान उ•ाणे स्थगित करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यादरम्यानच्या काळात प्रवास करणाऱ्या तिकीट बुक केलेल्या प्रवाशांची घोर निराशा झाली आहे. आर्थिक दिवाळखोरीचा सामना कंपनीला करावा लागतो आहे. गो फर्स्टची विमाने 3 मेपासून जमिनीवरच आहेत. याच आठवड्यात कंपनीने डिजीसीएला पुढील 5 महिन्यांच्या सेवेबाबत आणि 22 विमानांसह सेवा सुरु करण्याबाबत सविस्तर अहवाल पाठवला असून त्यांच्याकडून याबाबत मंजुरी मिळणे बाकी आहे. देणेकरींना पैसे परत न केल्यामुळे मेपासून गो फर्स्टची विमानसेवा विस्कळीत झाली आहे. निधीचा अभाव असल्याने कंपनीवर आर्थिक संकट घोंघावत आहे. याआधी कंपनीने 27 मेपर्यंत सेवा बंद राहणार असल्याचे म्हटले होते. पण आता पुन्हा कंपनीला 12 जूनपर्यंत सेवा रद्द राहणार असल्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.