4 हरवलेल्या मंदिरांपैकी एक असल्याची शक्यता
भारतातील कोणार्क सूर्य मंदिराबद्दल तुम्ही ऐकले असेल. परंतु आता इजिप्तमध्ये एका प्राचीन मंदिराचा शोध लागला आहे. हे मंदिर 4500 वर्षे जुने आहे. मातीच्या विटांनी तयार झालेली ही वास्तू इजिप्तच्या कालौघात गडप झालेल्या सूर्य मंदिरांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. इजिप्तमध्ये पाचवा राजवंश 2465 ते 2323 ख्रिस्तपूर्व कालखंडात सत्तेवर होता.
हे मंदिर कैरोच्या दक्षिणेस असलेल्या अबुसीरमध्ये राजा नुसेरेच्या मंदिराखाली सापडले आहे. इजिप्तच्या पुरातत्व आणि पर्यटन मंत्रालयाने ट्विट करत या रोमांचाक शोधाविषयी घोषणा केली आहे. अबू घोराबमध्ये राजा नुसेरे यांच्या मंदिरात संशोधन करत असलेल्या इटालियन आणि पोलिश पुरातत्व पथकाला मंदिराखाली मातीच्या विटांनी तयार करण्यात आलेल्या इमारतींचे अवशेष मिळाले असल्याचे यात नमूद आहे.
पाचव्या राजवंशाच्या कालौघात हरवून बसलेल्या 4 सूर्य मंदिरांपैकी हे एक असू शकते असे संकेत मिळाले आहेत. या मंदिरांबद्दल केवळ ऐतिहासिक स्रोतांद्वारे माहिती मिळते. इमारतीचा एक हिस्सा पाचव्या राजवंशाच्या 6व्या शासकाने स्वतःचे मंदिर निर्माण करण्यासाठी पाडविला होता असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
उत्खनन करणाऱया पथकाला जमिनीखाली मातीची भांडी मिळाली आहेत. पुढील संशोधनात त्यांचा उपयोग होणार आहे. पाचव्या राजवंशाच्या राजांच्या नावावर काही मोहोरही मिळाले आहेत. या ठिकाणी अद्याप संशोधन कार्य सुरू आहे. 19 व्या शतकात पहिले सूर्य मंदिर शोधण्यात आले होते, त्यानंतर झालेला हा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. इजिप्तमध्ये अशाप्रकारची 6 किंवा 7 मंदिरे होती, असे बोलले जाते. यातील केवळ 2 मंदिरांचा आतापर्यंत शोध लागला आहे.