वाकरे/प्रतिनिधी
कोल्हापूर- गगनबावडा राज्यरस्त्यावर वाकरे फाट्यानजीक स्कुटरवरून गावी जाणाऱ्या अंगणवाडी मदतनीस महिलेची अज्ञात वाहनाला धडक लागून झालेल्या भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. वैशाली महादेव मोरे (वय ३४ रा. तिसंगीपैकी बालेवाडी ता. गगनबावडा) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली मोरे या अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करतात. सोमवारी कामानिमित्त पतीसोबत त्या कोल्हापूरला गेल्या होत्या. काही कामामुळे पतींनी त्यांना पुढे जाण्यास सांगितले. काम आटोपून गावाकडे जात असताना वाकरे फाट्यानजीक त्यांची अज्ञात वाहनाला धडक बसली. त्यामुळे त्या रस्त्यावर आपटल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. यानंतर नागरिकांनी खाजगी ॲम्बुलन्समधून त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांची मालिका सुरूच
कोल्हापूर-गगनबावडा हा राज्य मार्ग केंद्रीय रस्ता विभागाकडे गेल्याने गेला आहे. सध्या या रस्त्याची इतकी दुरावस्था झाली आहे की ५० किलोमीटर रस्त्यावर १०० ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. त्यामुळे खड्डे चुकवण्यासाठी वाहनधारक कसरत करीत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळेच अपघातांची मालिका सुरू असून या निष्पाप महिलेचा यात बळी गेला आहे. आता तरी या रस्त्याकडे संबंधितांचे लक्ष जाणार का? अशी विचारणा होत आहे.