प्रतिनिधी / बेळगाव
केपीटीसीएल कनिष्ठ साहाय्यक अभियंता पदासाठी झालेल्या परीक्षेत अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या साहाय्याने कॉपी केली होती. राज्यात हे प्रकरण गाजले होते. याप्रकरणी गोकाक पोलिसांनी आणखी एका युवकाला अटक केली असून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 23 वर पोहोचली आहे.
भीमसी उर्फ भीमाप्पा सिद्धाप्पा गुदीगोप्प (वय 30) असे त्याचे नाव आहे. बुधवारी ही कारवाई केली. त्याला गोकाक जेएफएमसी न्यायालयासमोर हजर केले आहे. त्याच्याजवळून लॅपटॉप, सहा मोबाईल, 3 इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कार जप्त केली आहे.
कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पुरवून प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी भीमसीने मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याबरोबरच अत्याधुनिक डिव्हाईस खरेदीसाठी आर्थिक मदतही याच युवकाने केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 7 ऑगस्ट रोजी केपीटीसीएल कनिष्ठ साहाय्यक अभियंता पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी गोकाक पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला होता.