जानेवारी महिन्यात अशाप्रकारची तिसरी घटना
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियात सातत्याने मंदिरांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. मेलबर्नच्या अल्बर्ट पार्कमध्ये असलेल्या इस्कॉन मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिल्या गेल्या आहेत. मागील 15 दिवसांमध्ये अशाप्रकारची ही तिसरी घटना आहे. मंदिराच्या भिंतींवर खलिस्तान जिंदाबाद असा नारा लिहिण्यात आला आहे. व्हिक्टोरियन बहुधर्मीय नेत्यांच्या व्हिक्टोरियन मल्टीकल्चरल कमिशनसोबत झालेल्या बैठकीच्या दोन दिवसांनी हा प्रकार घडला आहे. अशाप्रकारच्या घटना वारंवार घडू लागल्यानेच ही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
इस्कॉन मंदिरातील घटनेसंबंधी व्हिक्टोरिया पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तर मंदिरांना लक्ष्य करण्यात येत असल्याने हिंदूधर्मीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू समुदायाच्या विरोधात द्वेषपूर्ण अजेंडा राबवत असलेल्या समाजकंटकांवर पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यापूर्वी श्री शिव विष्णू मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. त्यापूर्वी बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.