वृत्तसंस्था/ आसनसोल
तृणमूल काँग्रेसचे वादग्रस्त नेते अनुब्रत मेंडल यांची सीबीआयकडून नव्या आरोपांसंबंधी अनेक तास चौकशी करण्यात आली आहेत. अनुब्रत मोंडल यांना 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र ही लॉटरी बनावट असून मोंडल यांनी आपले काळ धन पांढरे करण्यासाठी लॉटरी लागल्याचा बनाव केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली.
मोंडल यांना गेल्या ऑगस्टमध्ये जनावरांच्या तस्करी करण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना आसनसोल येथील विशेष कारागृहात डांबण्यात आले आहे. तेथेच सीबीआय अधिकाऱयांनी त्यांची या कथित बनावट लॉटरी प्रकरणी चौकशी केली. लॉटरीत मिळालेले 1 कोटी रुपये मोंडल यांनी कोठे आणि कसे खर्च केले, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. जनावर तस्करीतून मिळालेला पैसा पांढरा करण्यासाठी लॉटरी तिकिट लागल्याचा खोटा दावा करण्यासंबंधीही त्यांना प्रश्न विचारण्यात आले. हे लॉटरी तिकीट त्यांच्यावतीने त्यांच्या एका शरीर संरक्षकाने खरेदी केल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली आहे.