वृत्तसंस्था/ सेऊल
उत्तर कोरियाच्या सेनेने दक्षिण कोरियाच्या दिशेने आणखी क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. यामुळे या भागातील तणाव वाढला असून अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या समर्थनार्थ युद्ध विमाने धाडली आहेत. या विमानांमध्ये दोन स्वनातीत अत्याधुनिक विमानांचाही समावेश आहे. दक्षिण कोरियाच्या संयुक्त सेनाप्रमुखांनी उत्तर कोरियाच्या हल्ल्यांची गंभीर दखल घेतली असून प्रत्युत्तराची तयारी केली आहे.
शनिवारी दुपारी उत्तर कोरियाने चार लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियाच्या दिशेने सोडली होती. ती दक्षिण कोरियाच्या समुद्र तटापासून 130 कि. मी. अंतरावर समुद्रात पडली. उत्तर कोरियाकडून सलग गेले तीन दिवस असा मारा करण्यात येत आहे. आतापर्यंत कोणतेही क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या भूमीवर पडलेले नाही. तथापि यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला असून त्याचा स्फोट केव्हाही होऊ शकतो, अशी परिस्थिती असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे. अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली आहे.