कोविड महामारीनंतर यंदा उत्सव थाटात
प्रतिनिधी/ मडगाव
कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे मडगावच्या दिंडी उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. यंदा हा उत्सव थाटात साजरा केला जात आहे. श्री हरिमंदिर देवस्थानच्या दिंडी उत्सवाचे यंदाचे 113 वर्षे होय. यानिमित्त सकाळी 7 वाजल्यापासून धार्मिक विधींना प्रारंभ होईल. सकाळी श्रींस महाअभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम. नंतर सुरेंद्र शेणवी बोरकर व साथी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी 12 वा. महाआरती व तद्नंतर महाप्रसाद (अन्नसंतर्पण) होईल.
संध्याकाळी 5 वा. वारकरी संप्रदायतर्फे भजनाचा कार्यक्रम. सांयकाळी 6.15 वा. श्री माऊलीची धार्मिक ग्रंथासह श्रींच्या रथात स्थापना. तद्नंतर 6.30 वा. श्री हरिमंदिरासमोरील व्यासपीठावर ‘पहिली गायनी बैठक’ होईल. या बैठकीत प्राजक्ता काकतकर व अभिजीत काळे यांचे गायन होईल. नंतर न्यू मार्केट परिसरात दुसरी तर तिसरी बैठक मडगाव नगरपालिकेसमोर होणार आहे.
दिंडी महोत्सवाची सांगता सोमवार दि. 7 रोजी होईल. या दिवशी ‘गोपाळकाला’ होईल व नंतर महाआरती. रात्री 8 वा. सुप्रसिद्ध गायिका सुजाता गुरव (धारवाड) यांच्या गायनाची बैठक होईल.
दिंडी स्पर्धा ठरणार आकर्षण
दिंडी महोत्सवाचे आQिचत्य साधून श्री दामबाबाले घोडे कल्चरल असोसिएशनतर्फे दिंडी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेला दरवर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतो. सायंकाळी 6 वा. श्री हरिमंदिर देवस्थान येथून दिंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. त्यानंतर स्टेट बँकजवळ उभारण्यात येणाऱया श्री दामबाब चौकात दिंडी पथके रिंगण सादर करतील. यावेळी अखिल गोवा पातळीवर आकाशकंदील व फळे-भाजी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बाबू गडेकर यांचा सत्कार
या दिंडी स्पर्धेच्या दरम्यान, गोव्यातील विक्रमवीर दिंडी संयोजक बाबू गडेकर यांचा श्री दामबाबाले घोडे क्लचरल असोसिएशनतर्फे सत्कार केला जाणार आहे. बाबू गडेकर यांनी आतापर्यंत 558 दिंडीचे संयोजन केले आहे. गोव्यात असा विक्रम करणार ते पहिले व्यक्ती होय.
सॉलिड पार्टीची रांगोळी स्पर्धा
मडगावच्या सॉलिड पार्टीतर्फे दिंडी महोत्सवात दरवर्षी रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते. आकर्षक रांगोळय़ा हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ बनून राहिले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत ही स्पर्धा मडगाव पालिकेच्या आगाखान उद्यानात घेतली जाणार आहे. या स्पर्धेत गोव्यात रांगोळी कलाकार मोठय़ा संख्येने सहभागी होत असतात.
युव संजीवनीतर्फे कार्यक्रम
कोंबवाडा-मडगाव येथे युव संजीवनीतर्फे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वर दिंडी’ हा कार्यक्रम खास आकर्षण ठरणार आहेत. या कार्यक्रमात ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेतील गायक कलाकार अनिरुद्ध जोशी (नागपूर), संज्योती जगदाळे (पुणे)s तसेच गोव्याच्या नवाब शेख आणि खुशबू हळदणकर या कलाकारांचा सहभाग आहे. त्याशिवाय अन्य स्पर्धा घेतल्या जातील.