100 रुपयांपासून व्यवसाय : बागायतीतर्फे प्रशिक्षणाची सोय
बेळगाव : बेरोजगारांना रोजगार प्राप्त होऊन व्यवसाय मिळावा, यासाठी बागायत खात्यातर्फे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आज हजारो बेरोजगार व्यवसाय करू लागले आहेत. विशेषत: केवळ 100 रुपयात हा व्यवसाय सुरू करता येतो. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणी आणि महिलांनी याला पसंती दिली आहे. शरीरात प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांवर गुणकारी ठरणारे कृत्रिम अळंबी उत्पादन अनेक बेरोजगारांना आधार ठरू लागले आहे. मागील वर्षभरात हजारो बेरोजगारांनी या उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यापैकी 160 जण व्यवसायात विस्तारले आहेत. त्यामुळे हा आदर्श घेऊन नवीन प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांची आणि महिलांची संख्या वाढू लागली आहे. आरोग्यास उत्तम असणाऱ्या अळंब्यांची मागणी अधिक आहे. विशेषत: कॅल्शियम, प्रोटीन्स अधिक असल्याने शरीराला पोषक आहे. केवळ नैसर्गिकरित्या अळंबीचे उत्पादन होते हे आपल्याला माहीत आहे. मात्र कृत्रिमरित्यादेखील अळंबी उत्पादन करून आपण व्यवसाय करू शकतो.
बागायत खात्यातर्फे क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये सवलतीच्या दरात म्हणजे केवळ 250 रुपयात अळंबी उत्पादन प्रशिक्षण दिले जाते. शिवाय अल्पदरात बी बियाणांचा पुरवठादेखील केला जातो. हा व्यवसाय एखाद्या लहान खोलीत सुरू करता येतो. त्यामुळे निवृत्त व्यक्ती, गृहिणी आणि बेरोजगारांना उत्तम ठरणार आहे. अलिकडे हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. हॉटेल, मेस आणि इतर ठिकाणीदेखील आळंब्याची मागणी वाढत आहे. शिवाय वर्षभर अळंबी उत्पादन करता येत असल्याने नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. केवळ 100 रुपयांपासून या व्यवसायाला सुरुवात करता येते. पुढे विस्तार वाढून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करता येतो. त्यामुळे अळंबी उत्पादनाला तरुणी आणि महिलांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. बाजारात 400 ते 500 रुपये किलो अळंबींचा दर आहे. मात्र आपण घरबसल्या केवळ 100 रुपयात अळंबी उत्पादन करू शकतो. गतवर्षी खात्याने 1375 किलो अळंब्यांचे उत्पादन केले होते. यंदा तब्बल चार टन अळंबी उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिलांना रोजगार मिळावा आणि आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी खात्यामार्फत अळंबी प्रशिक्षण दिले जात आहे. निवृत्त नागरिक, बेरोजगार महिलांनी अळंबी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि व्यवसाय करावा, असे आवाहन बागायत खात्याने केले आहे.
अळंबी व्यवसायातून बेरोजगारांना व्यवसायाची संधी
अळंब्यांचे उत्पादन कसे करावे आणि व्यवसाय कसा करावा? याबाबत सविस्तर प्रशिक्षणात माहिती दिली जाते. शिवाय आळंबी उत्पादनासाठी केवळ माफक दरात बी बियाणेदेखील उपलब्ध करून दिली जातात. आळंबी व्यवसायातून अनेक बेरोजगारांना व्यवसायाची संधी उपलब्ध आहे.
नेत्रांजली भोसले, (साहाय्यक निर्देशिका, बागायत खाते)
व्यवसायातून आर्थिक पाठबळ
अळंबी उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. घरबसल्या अळंबी उत्पादन करता येते. घरातल्या लोकांना खाण्याबरोबर अळंबीची विक्रीदेखील करता येते. त्यामुळे यातून आर्थिक पाठबळ मिळते. जोड व्यवसाय म्हणून आळंबी उत्पादन करता येते.
गीता कुंडेकर (मुचंडी, अळंबी प्रशिक्षणार्थी)