असानी चक्रीवादळ आज धडकणार
वृत्तसंस्था / विशाखापट्टणम
चालू वर्षातील पहिले चक्रीवादळ असानीने मंगळवारी आंध्रप्रदेशच्या किनारी भागांमध्ये प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली आहे. वेगवान वाऱयांसह पावसाने मंगळवारी आंध्रप्रदेशच्या अनेक शहरांमध्ये हजेरी लावली आहे. विशाखापट्टणम येथे मुसळधार पाऊस पडला आहे. राज्यातील श्रीकाकुलम, विजयानगरम, अनाकापल्ली, काकीनाडा, कोनासीमा, पश्चिम गोदावरी, कृष्णा, गुंटूर, नेल्लोरमध्येही पाऊस पडला आहे. हवामान विभागानुसार असानी चक्रीवादळ बुधवारी सकाळपर्यंत आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम आणि काकीनाडादरम्यान किनारी भागांमध्ये धडकू शकते. विभागाने आंध्रप्रदेशसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
असानी चक्रीवादळ सध्या आंध्रप्रदेशच्या किनारी भागाच्या दिशेने सरकत आहे. आंध्रनंतर हे चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने सरकरणार असून तेथे अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे वैज्ञानिक संजीव द्विवेदी यांनी म्हटले आहे. तर आंध्रप्रदेशच्या किनारी भागांमध्ये बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.
खराब हवामानामुळे मंगळवारी विशाखापट्टणम विमानतळावरील 23 विमानोड्डाणे रद्द करण्यात आली. तर चेन्नई विमानतळानेही 10 उड्डाणे रद्द केली आहेत. यात हैदराबाद, विशाखापट्टणम, जयपूर आणि मुंबईसाठीची विमानोड्डाणे सामील आहेत. भुवनेश्वर येथील हवामान केंद्रानुसार पुढील 24 तासांमध्ये ओडिशाच्या मल्कनगिरी, गजपति, गंजम आणि पुरी जिल्हय़ांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना 13 मेपर्यंत समुद्र किनाऱयापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागानुसार पुढील 24 तासांमध्ये बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागांमध्ये 90-125 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहू शकतात.
ओडिशाच्या गंजम जिल्हय़ात मंगळवारी मच्छिमारांची एक नौका उलटली असून सर्व मच्छिमार पोहून किनाऱयावर पोहोचले आहेत. असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याहंनी 10-12 मेपर्यंतचे स्वतःचे दौरे रद्द केले आहेत. चक्रीवादळाचा प्रभाव बिहार, झारखंड आणि छत्तीसगडमध्येही दिसून येणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये अलर्ट
हवामान विभागाने पश्चिम बंगालच्या हावडा, कोलकाता, हुगळी आणि पश्चिम मिदनापूर जिल्हय़ांमध्ये वादळी वाऱयांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. वादळी वाऱयादरम्यान लोकांना सुरक्षितस्थळी राहण्याचा सल्ला देण्यात आला.
ओडिशात डेंजर झोन घोषित
ओडिशातील पारादीप, गोपालपूर, धमरा आणि पुरी या बंदरांना डेंजर झोन घोषित करण्यात आले आहे. या भागांमध्ये एनडीआरएफ आणि ओडीएआरएफची पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती ओडिशा रिलिफ कमिशयन पी.के. जेना यांनी दिली आहे.