पुणे / प्रतिनिधी :
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या कृतीचा विपर्यास करून त्यांना मुद्दाम टार्गेट केल जात आहे. एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्याची विकेट काढण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. मात्र, संजय राऊत यांची विकेट विरोधकांना कधीच मिळणार नाही, असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी व्यक्त केला.
सारसबाग परिसरातील बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बाळकडू’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचा बक्षिस वितरण सुषमा अंधारे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पंकजा मुंडे पक्ष सोडतील असे वाटत नाही
अंधारे म्हणाल्या, एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे यांचे घनिष्ठ संबंध होते. भाजपवर नाराज असताना देखील खडसे गोपीनाथ गडावर गेले होते. त्यामुळे खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. पंकजा मुंडे या पक्ष सोडतील, असे वाटत नाही.
भाजपने आमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिकार करू नये
शिंदे गटातील वाचाळवीर नेत्यांमुळे त्यांचे महत्व कमी झाले असून, वारंवार होणाऱ्या चुकांमुळे शिंदे गटाबद्दल नकारात्मकता वाढत आहे. आगामी निवडणुकीत हे वाचाळवीर नेते भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे भाजपला शिंदे गटाचे ओझ उतरून टाकायचे आहे. विदर्भातील भाजपच्या संघटनात्मक बांधणीतील महत्वाच्या पदाधिकाऱयाने शिंदे गटातील एका कॅबिनेट मंत्र्याच्या घोटाळय़ाची कागदपत्रे माझ्याकडे दिली आहेत. मात्र, मारून आणलेली शिकार आम्ही करत नाही. भाजपने आमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिकार करू नये. झारीतला शुक्राचार्य कोण आहे? हे शोधण्याची शिंदे गटावर वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.