रोप बाजारात 12 हजार रोपांची विक्री, पर्यावरणप्रेमींचा प्रतिसाद, आज सांगता
प्रतिनिधी/ बेळगाव
बागायत खात्यामार्फत भरविण्यात आलेल्या रोप बाजाराला निसर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दोन दिवसांत 12 हजार फळ-पुष्प रोपांची विक्री झाली आहे. यातून 3 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रोप बाजाराला अधिक प्रतिसाद मिळाला आहे.
फळ बागायत क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टिकोनातून दरवषी बागायत खात्यामार्फत रोप बाजाराचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र यंदा भरविलेल्या बाजाराला पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या रोप बाजारात आंबा, फणस, चिकू, सीताफळ, काजू, पेरू यासह गुलाब, पाम, जास्वंदी, मोगरा आदी रोपे विक्रीसाठी ठेवली आहेत. दरम्यान अधूनमधून पाऊस होत असल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोप लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी विविध रोपांची खरेदी करण्यासाठी नागरिकांचा ओढा वाढला आहे.
या रोप बाजारात विविध शोभिवंत रोपेही उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे घरच्या गच्चीवर आणि इतरत्र रोपे ठेवण्यासाठी नागरिकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. याबरोबर अळंबी आणि नैसर्गिक मधदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याबरोबर विविध सेंद्रीय खतेही उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे बाजाराला भेट देणाऱया शेतकऱयांची संख्याही अधिक आहे.
आज शेवटचा दिवस
क्लब रोड येथील हय़ूमपार्कमध्ये शुक्रवारपासून रोप बाजार भरविण्यात आला आहे. या रोप बाजारामध्ये विविध जातींच्या फळा-फुलांची रोपे ठेवण्यात आली आहेत. रविवारी या रोप बाजाराची सांगता होणार आहे.
महांतेश मुरगोड (उपनिर्देशक बागायत खाते)
पर्यावरणप्रेमींचा रोप बाजाराला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे दुसऱया दिवशी रोपांची विक्री अधिक झाली आहे. पुन्हा विविध जातींची रोपे मागविण्यात आली आहेत. रविवारी शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. शिवाय विविध रोपटी दाखल होणार आहेत.