वृत्तसंस्था/ ऍडलेड
पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेत शनिवारी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय हॉकी संघाचा चुरशीच्या लढतीत 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात भारताच्या आकाशदीप सिंगने नोंदवलेली हॅट्ट्रीक वाया गेली.
हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा झाला. भारतातर्फे आकाशदीप सिंगने 10 व्या, 27 व्या आणि 59 व्या मिनिटाला गोल नोंदवले. भारताचा आणखी एक गोल कर्णधार हरमनप्रित सिंगने 31 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर नेंदवला. ऑस्ट्रेलियातर्फे लॅचलन शार्पने 5 व्या, नाथन एफ्रॉम्सने 21 व्या, टॉम क्रेगने 41 व्या, ब्लेक गोव्हर्सने 57 व्या आणि 60 व्या मिनिटाला गोल नेंदवले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा खाते उघडून भारतावर आघाडी घेतली होती. भारताने 10 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधली. 21 व्या मिनिटाला पुन्हा ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली. आकाशदीपच्या दुसऱया गोलवर भारताने 27 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाशी बरोबरी केली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते.
सामन्यातील उत्तरार्धात भारतातर्फे दोन गोल तर ऑस्ट्रेलियातर्फे तीन गोल नोंदवले गेले. शेवटच्या तीन मिनिटांच्या कालावधीत गोव्हर्सने दोन गोल करून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळविला जाणार आहे. शनिवारच्या सामन्यातील विजयामुळे यजमान ऑस्ट्रेलियाने या हॉकी कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी भारतावर मिळवली आहे.