वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या लंका दौऱयामध्ये फिरकी गोलंदाजीची मदार प्रामुख्याने ऍस्टॉन ऍगरवर राहील. लंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेला 7 जूनपासून प्रारंभ होत आहे.
ऑस्टेलियन संघ लंकेच्या दौऱयात 3 टी-20 सामने तसेच 5 वनडे सामने खेळणार आहे. या दौऱयासाठी ऑस्ट्रेलियन संघातील फिरकी गोलंदाज ऍडॅम झाम्पा उपलब्ध राहणार नाही. झाम्पाच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियन संघाच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदार प्रामुख्याने ऍगरवर राहील. ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पिंचकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत ऍगरच्या कामगिरीत सातत्य दिसत असून तो टी-20 प्रकारात ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे फिंचने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे लंकेत यापूर्वी आगमन झाले असून शुक्रवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाच्या सराव सत्रामध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज ऍगरने कसून सराव केला.
गॅलेच्या खेळपट्टीवर होणाऱया पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात तीन फिरकी गोलंदाजांना संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघामध्ये मिशेल स्वेप्सन आणि नॅथन लियॉन प्रमुख फिरकी गोलंदाज आहेत. 2019 क्रिकेट हंगामापासून आतापर्यंत झाम्पाने ऑस्ट्रेलियाच्या 45 टी-20 सामन्यापैकी 42 सामन्यात प्रतिनिधीत्व पेले आहे. या कालावधीत फिंचने 39 तर मॅथ्यू वेडने 34 टी-20 सामने खेळले आहेत. ऍगरने 28 टी-20 सामने खेळले. या मालिकेसाठी झाम्पा आणि ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स उपलब्ध होवू शकणार नाही. या आगामी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्टोनीस, मॅक्सवेल, वेड, वॉर्नर, हॅजलवूड यांचा समावेश आहे.