पोलीस आयुक्तांचे शिवजयंती उत्सव मंडळांना आवाहन : मिरवणूक शांततेत होण्यासाठी प्रत्येक मंडळाने पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक भव्य स्वरूपात साजरी केली जाते. पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व विचार चित्ररथांमधून समजतो. बेळगावसह आसपासच्या भागातून शिवभक्त चित्ररथ पाहण्यासाठी मिरवणुकीत येतात. डीजेमुळे होणारा गोंधळ पाहण्यासाठी शिवभक्त येत नाहीत. त्यामुळे डीजे टाळून चित्ररथ मिरवणुकीतून शिवचरित्राचे दर्शन घडवा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी शिवजयंती उत्सव मंडळांना केले.
बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयानजीकच्या समुदाय भवनात शिवजयंती मंडळांच्या पदाधिकाऱयांशी पोलिसांनी चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या. यावेळी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा व उपायुक्त रविंद्र गडादी उपस्थित होते.
मिरवणूक शांततेत होण्यासाठी प्रत्येक मंडळाने पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक हालचालीवर पोलिसांची नजर असणार आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. संवेदनशील भागावर पोलिसांची विशेष नजर राहील. पोलिसांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच प्रसंग सादर करायचे आहेत. मिरवणुकीला विस्कळीतपणा येवू नये यासाठी एकामागून एक चित्ररथ राहतील, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
प्रत्येक मंडळाने स्वयंसेवक तयार करावेत
उपायुक्त रविंद्र गडादी यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. डीजे लावणे ही आमची संस्कृती नसून आपल्या राजाचा उत्सव साजरा करायचा आहे. अन्य कोणताही समाज दुखावला जाईल, अशी कृती कोणत्याही मंडळाने तसेच कार्यकर्त्याने करू नये. महिला व लहान मुलांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक मंडळाने स्वयंसेवक तयार करावेत, असे उपायुक्तांनी नमूद केले. चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, प्रशांत भातकांडे व शरद पाटील यांनी पोलीस व मंडळांना सूचना केल्या.
आठ ठिकाणी होणार प्रसंगांचे सादरीकरण
एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व वेळेचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी चित्ररथ मिरवणुकीसाठी 8 ठिकाणांची निवड केली आहे. या ठिकाणी मंडळांना प्रसंगांचे सादरीकरण करावे लागणार आहे. सिंडीकेट बँक मारुती गल्ली, मारुती मंदिर, हुतात्मा चौक, समादेवी गल्ली कॉर्नर, यंदे खूट, छत्रपती संभाजी महाराज चौक, टिळक चौक व हेमू कलानी चौक या ठिकाणी प्रसंग सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.